नवी दिल्ली : २०१८-१९ या वित्त वर्षात डॉक्टर, वकील आणि लेखा परीक्षक (सीए) यासारख्या व्यावसायिकांपैकी २,२०० जणांनी आपले उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखविले आहे. प्राप्तिकर विभागाने टष्ट्वीटची एक मालिका जारी करून ही माहिती जाहीर केली.प्राप्तिकर विभागाने एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, या वित्त वर्षात दाखल करण्यात आलेल्या वैयक्तिक आयटीआरपैकी डॉक्टर, लेखा परीक्षक व वकील यासारख्या व्यावसायिकांच्या श्रेणीतील केवळ २,२०० लोकांनी आपले वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखविले आहे. यात भाडे, व्याज, भांडवली लाभ या मार्गांनी मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कर भरण्याचे आवाहन बुधवारी लोकांना केले होते. मोठ्या संख्येने लोक कर भरत नाहीत, तेव्हा प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांवर बोजा पडतो. देशात केवळ २,२०० लोकांनी आपले वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपये दाखविले आहे. हे अविश्वसनीय असले तरी खरे आहे, असे मोदी यांनी म्हटले होते.
प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या टष्ट्वीटच्या मालिकेत म्हटले आहे की, वैयक्तिक करदात्यांच्या बाबतीत काही दिशाभूलकारक माहिती समाज माध्यमांवर प्रसृत होत आहे. त्यामुळे विभागाकडून ही अधिकृत माहिती जारी करण्यात येत आहे. २०१८-१९ या वर्षात ५.७८ कोटी लोकांनी विवरणपत्रे दाखल केली. त्यापैकी १.०३ कोटी लोकांनी आपले उत्पन्न २.५ लाख रुपयांच्या खाली दाखविले आहे. ३.२९ कोटी लोकांनी आपले उत्पन्न २.५ लाख ते ५ लाख रुपये यादरम्यान दाखविले आहे. ४.३२ कोटी लोकांनी आपले उत्पन्न ५ लाख रुपयांपर्यंत दाखविले आहे. वित्त विधेयक २०१९ अन्वये ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, २०१९-२० या वित्त वर्षात या लोकांना प्राप्तिकर लागणार नाही. फक्त १.४६ कोटी लोकांनाच कर भरणे बंधनकारक असेल.प्राप्तिकर विभागाने म्हटले की, १ कोटी लोकांनी आपले उत्पन्न ५ ते १० लाख यादरम्यान दाखविले आहे. तसेच फक्त ४६ लाख लोकांनी १० लाखांच्या वर उत्पन्न दाखविले आहे. ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दाखविणाºया करदात्यांची संख्या ३.१६ लाख, तर ५ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न दाखविणाऱ्यांची संख्या ८,६०० आहे.