Join us

‘रॅन्समवेअर’बाबत सतर्क राहा; केंद्राच्या सूचना

By admin | Published: May 16, 2017 2:00 AM

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’नामक रॅन्समवेअर व्हायरसपासून आपल्या संगणकप्रणालींचे संरक्षण करा, अशा सूचना आयटी मंत्रालयाने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’नामक रॅन्समवेअर व्हायरसपासून आपल्या संगणकप्रणालींचे संरक्षण करा, अशा सूचना आयटी मंत्रालयाने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया, एनआयसी आणि यूआयडीएआय (आधार) यासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांना दिल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) या सायबर सुरक्षा संस्थेलाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. रॅन्समवेअर व्हायरसने १०० पेक्षा जास्त देशांत धुमाकूळ घातला आहे. रशिया आणि ब्रिटन या देशांना सर्वाधिक फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एक्सपी’सारख्या जुन्या मायक्रोसॉफ्ट आॅपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या संगणकांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. व्हायरसच्या हल्ल्यानंतर संगणक लॉक होतो. तो उघडण्यासाठी व्हायरस बिटकॉनसारख्या आभासी चलनातील ३00 डॉलरची खंडणी मागतो.या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सुरक्षा पॅच तयार केला असून, तो तात्काळ डाऊनलोड करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत.भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाने म्हटले की, भारतात रॅन्समवेअरच्या मोठ्या हल्ल्याचे वृत्त नाही. आंध्र प्रदेशातील पोलीस विभागाचे काही संगणक बाधित झाले आहेत. त्यांना ‘सीईआरटी-इन’च्या सूचना पाळण्यास सांगण्यात आले आहे. आयटी मंत्रालयाने म्हटले की, यासंबंधीच्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्व संबंधित संस्थांशी समन्वय ठेवून काम केले जात आहे. टेलिकॉम विभाग, डाटा सेक्युरिटी कौन्सिल आॅफ इंडिया (डीएससीआय) आणि सीडॅक या संस्थांनाही सतर्क करण्यात आले आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांना मोबाईल ग्राहकांच्या डाटाची सुरक्षा कशी करता येईल, याची काळजी घेण्यास सांगा, असे टेलिकॉम विभागास सांगण्यात आले आहे. आयटी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि तिच्या सर्व भागीदारांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व ग्राहकांना आवश्यक पॅचेस वापरण्यास सांगा, असे मायक्रोसॉफ्टला बजावण्यात आले आहे.