Join us

पोलाद, अ‍ॅल्युमिनियमवर अमेरिकेचा आयात कर, चीन, युरोपबरोबर सुरू होणार व्यापारयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:11 AM

अमेरिकन उत्पादकांचे हित जपण्यासाठी अमेरिका पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवर आयात कर लादणार असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकन उत्पादकांचे हित जपण्यासाठी अमेरिका पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवर आयात कर लादणार असल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यामुळे आगामी काळात अमेरिकेचे चीन आणि युरोपबरोबर व्यापारयुद्ध सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील रोजगारात वाढ होण्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.अमेरिकेतील पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियम कंपन्यांच्या प्रमुख अधिका-यांबरोबर ट्रम्प यांची बैठक झाली. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी पोलादावर २५ टक्के तर अ‍ॅल्युमिनियमवर १० टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय लवकरच अंमलात आणला जाणार असल्याचे जाहीर केले. या आयात शुल्कामुळे अमेरिकेतील उत्पादकांचे हित साधले जाणार असून त्यातून देशातील रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.अमेरिकेतील पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियम उद्योग रसातळाला गेले आहेत. या दोन्ही उद्योगांना गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज असून त्यासाठी योग्य ती सर्व मदत त्यांना दिली जाणार आहे. अमेरिकेतील वाहन उत्पादक तसेच आॅटोमोबाइल कंपन्या मेक्सिकोमध्ये का गेल्या हे समजू शकत नाही. या आधीच्या धोरणकर्त्यांनी याबाबत काय विचार केला ते समजू शकले नाहीत अशा शब्दात ट्रम्प यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. ट्रम्प यांच्या घोषणेचे पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियम उत्पादकांनी स्वागत केले आहे. मात्र काही अमेरिकन घटकांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. हा निर्णय अमेरिकन अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करणारा ठरण्याची भीती या घटकांनी व्यक्त केली आहे.ट्रम्प यांच्या या निर्णयाने जागतिक पातळीवर व्यापारयुद्ध सुरू होण्याची भीती वॉलस्ट्रीट जर्नलने व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर न्यूयॉर्क शेअर बाजाराचा डो जोन्स हा निर्देशांक ४०० अंशांनी खाली आला. यावरून शेअर बाजाराची या निर्णयावरील प्रतिक्रिया समजून येते.दरम्यान, युरोपियन युनियनने अमेरिकेच्या या निर्णयावर कडक शब्दात टीका केली आहे. अमेरिकेचा निर्णय म्हणजे जागतिक व्यापारात युद्ध सुरू करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे अमेरिकेला होणारी पोलादाची निर्यात ५० टक्क्यांनी कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. युरोपियन युनियनने काढलेल्या पत्रकात अमेरिकेच्या या निर्णयाला खंबीरपणे विरोध केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.>चीनचा इशाराअमेरिकेच्या पोलाद निर्यातीतील ११ व्या क्रमांकावर असलेल्या चीनने अमेरिकेच्या निर्णयावर कडक टीका केली आहे. अमेरिकेचा निर्णय हा केवळ आपला व्यापार सुरळीत राखण्यासाठी नसल्याचेही चीनने म्हटले आहे. अमेरिकेचे उदाहरण अन्य देशांनी गिरविल्यास जागतिक व्यापारात मोठे अडथळे निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशाराही चीनने दिला आहे.