- संजय देशमुख जालना : गेले वर्षभर स्टील उद्योजकांना दर घसरणीने चिंतीत केले होते, ही चिंता काही अंशी आता दूर झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्टीलच्या दरात सरासरी २० टक्के वाढ झाली आहे. या वाढीचे उद्योजकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी, ही दरवाढ एक प्रकारचा फुगवटा असून, ही कायम राहीलच असे नसून, आमच्या उत्पादन खर्चात या दरवाढीमूळे कुठलाच सकारात्मक परिणाम झाला नसल्याचे उद्योजकांनी नमूद केले.जालन्यात १२ मोठे स्टीलचे कारखाने आणि छोटे २१ आहेत. येथेच कच्चा आणि पक्का माल उत्पादित होत असल्याने जालन्याचे स्टील हे देशातील बहुतांश सर्व राज्यात विकले जाते. गेले वर्षभर या उद्योगाने अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्ग काढला. दराच्या घसरणीसह घटलेली मागणी देखील या उद्योगाला अडचणीत आणणारी ठरत आहे. अशाही स्थितीत उद्योजकांनी उत्पादनात घट न आणता मागणीपूर्व मोठे उत्पादन केले. मागणी नसल्याने मोठ्या प्रमाणावर माल पडून राहिल्याने उद्योजक हवालदिल झाले होते. या एकट्या उद्योगात जवळपास दोन हजार कोटीपेक्षा अधिकची गुंतवणूक उद्योजकांनी करून जालन्याचे नाव देशभर पोहचवले. काळानुरूप तंत्रज्ञानात बदल करून टीएमटी आणि गंजरोधक तंत्राचा वापर करून स्टीलचे उत्पादन केल्याने राज्यांनी जालन्याचा धसका घेतला होता.ही दरवाढ म्हणजे केवळ फुगवटाकेंद्र आणि राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केल्या प्रमाणे अद्यापही स्थानिक स्टील त्या-त्या भागात सुरू असलेल्या रस्ते, पूल तसेच अन्य बांधकामांमध्ये वापरणे बंधनकारक करावे आश्वासन दिले होते. ते पाळले नसल्याची खंत आहे. काही बड्या कंपन्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही बड्या कंपनीचे स्टील वापरावे असे लिखित आदेश काढून एक प्रकारे अन्य स्टील उद्योगांवर अन्याय केला आहे. दुसरीकडे २० टक्के भाववाढ म्हणजे कच्च्या मालात जी दरवाढ झाली आहे, त्याचे हे परिणाम असून, ही दरवाढ म्हणजे केवळ एक फुगवटा आहे. ही कायम राहीलच असे नाही.- योगेश मानधनी, अध्यक्ष स्टील मुन्यफॅक्चरींग असोसिएशन, महाराष्ट्र
स्टीलच्या दरात २० टक्के वाढीने उद्योगाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 1:54 AM