मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक मंगळवारी नव्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाले. अधिक सकारात्मक जीडीपी डेटाची अपेक्षा आणि कोविड-१९ साथीवरील लसीबाबत आशादायक स्थिती यामुळे शेअर बाजारांना बळ मिळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रुपयाची मजबुती आणि विदेशी भांडवलाचा मजबूत अंतर्प्रवाह याचा लाभही शेअर बाजारांना झाला, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५०५.७२ अंकांनी अथवा १.१५ टक्क्यांनी वाढून ४४,६५५.४४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४०.१० अंकांनी अथवा १.०८ टक्क्याने वाढून १३,१०९.०५ अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांचा हा सार्वकालिक उच्चांक ठरला.
सनफार्माचे समभाग सर्वाधिक ५.५१ टक्क्यांनी वाढले. त्याखालोखाल इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि बजाज ऑटो यांचे समभाग वाढले. याउलट कोटक बँक, नेस्टले इंडिया, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग १.४० टक्क्यापर्यंत घसरले.
भारतीय अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये जीडीपीच्या घसरगुंडीचा कल कमी होऊन ७.५ टक्क्यांवर आला असल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले. आधी तो १० टक्क्यांपेक्षा जास्त गृहीत धरण्यात आला होता.
शुक्रवारच्या आकडेवारीनुसार ७,७१२.९८ कोटी रुपयांच्या खरेदीसह विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भांडवली बाजारातील सर्वांत मोठे खरेदीदार ठरले.
जागतिक बाजारही वाढले
जागतिक शेअर बाजारही सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने सुधारत असल्याचे संकेत चीनमधील कारखाना उत्पादानाच्या उत्साहवर्धक आकडेवारीतून मिळाले आहेत. शांघाय, टोकियो, हाँगकाँग आणि सेऊल यांसह आशियाई बाजार लक्षणीयरीत्या तेजीत राहिले. युरोपात तेजीचे वातावरण दिसून आले.