Join us  

शेअर बाजारामुळे उसळीने चांदीला डाग; दोन दिवसांत २९०० रुपयांची मोठी घसरण, सोनेही उतरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 9:19 AM

शेअर बाजारात येत असलेल्या उसळीचा परिणाम होऊन हे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून भाववाढ होत गेलेल्या चांदीच्या दरात दोन दिवसांत २ हजार  ९०० रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदी थेट ५७ हजार रुपये प्रति किलोवर आली. शेअर बाजारात येत असलेल्या उसळीचा परिणाम होऊन हे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचेही भाव दोन दिवसांत ३०० रुपये प्रति तोळ्याने कमी होऊन ते ५२ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. 

जुलै महिन्यात घसरण झालेल्या सोने-चांदीच्या दरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा भाववाढ सुरू झाली होती. मात्र, शेअर बाजारात तेजी येत असल्याने त्याचा परिणाम सुवर्ण बाजारात होत आहे. 

सेन्सेक्स ६० हजारांच्या पुढे गेला असताना गुरुवार, दि. १८ ऑगस्ट रोजी चांदी एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी घसरून ५७ हजार ९०० रुपये प्रति किलोवर आली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. १९ ऑगस्ट रोजी चांदीत पुन्हा ९०० रुपयांची घसरण होऊन ती ५७ हजार रुपये प्रति किलोवर आली. शेअर बाजारातील चढ-उताराचा परिणाम सुवर्ण बाजारावर झाला आहे.

महिनाभरापूर्वीचे भाव

जुलै महिन्यात सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले होते. १९ जुलै रोजी चांदी ५७ हजारांवर होती. आता १९ ऑगस्ट रोजीही ती पुन्हा याच भावावर आली आहे. ती ६० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. आता त्यात घसरण झाली आहे. सोन्याच्या भावावर जास्त परिणाम नसून ते ३०० रुपयांनी घसरून ५२ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. 

टॅग्स :शेअर बाजारसोनंचांदी