मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ नोव्हेंबर २०१८ नंतर इराणकडून कच्चे तेल घेणाऱ्या देशांना अमेरिका बघून घेईल, असा धमकीवजा गर्भित इशारा दिल्याने जगभरचे शेअर बाजार गुरुवारी धडाधड कोसळले आहेत.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सही ७५९.७४ अंकांनी घसरून ३४,००१.१५ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सहा महिन्यांचा नीचांक ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२५.४५ अंकांनी घसरून १०,२३४.६५ अंकांवर बंद झाला. आजच्या घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांच्या बाजारातील संपत्तीचे मूल्य ३ लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांनी कमी झाले आहे. जागतिक बाजारांत मोठी पडझड झाली. जपानचा निक्केई ३.८९ टक्क्यांनी घसरला. ही मार्चनंतरची सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली. चीनचा शांघाय कंपोजिट ५.२२ टक्क्यांनी, तर हाँगकाँगचा हँग सेंग ३.७३ टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजारांपैकी पॅरिसचा कॅग-४०, जर्मनीचा डॅक्स आणि लंडनचा एफटीएसई अनुक्रमे १.३६ टक्के, १.२० टक्के आणि १.७० टक्के घसरला.ट्रम्प यांची ‘फेड’वर जाहीर टीकाअमेरिकेच्या न्यूयॉर्क शेअर बाजारालाही जबर हादरा बसला. ‘डाऊ जोन्स इंस्ट्रियल अॅव्हरेज’ हा निर्देशांक तब्बल ८०० अंकांनी घसरला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे खापर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर वाढीवर फोडले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षाने इतिहासात पहिल्यांदाच फेडवर जाहीर टीका केली आहे. ट्रम्प यांनी वॉशिंगटनमध्ये पत्रकारांशी बातचीत केली. पत्रकारांनी बाजारातील घसरणीकडे त्यांचे लक्ष वेधले असता ट्रम्प म्हणाले की, मला त्याची (घसरणीची) चिंता वाटत नाही. मला वाटते फेड चुका करीत आहे. ते इतके कठोर झाले आहेत की, मला वाटते फेड वेडा झाला आहे.नाणेनिधीकडून फेडचे समर्थननुसा दुवा (इंडोनेशिया) : ट्रम्प यांनी केलेल्या टीकेनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिन लगार्ड यांनी अमेरिकी फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर वाढीचे समर्थन केले आहे. लगार्ड यांनी बाली येथे पत्रकारांना सांगितले की, फेडचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत घटकांना धरूनच आहे. अर्थव्यवस्था सुधारणा दर्शवित आहेत, महागाई वाढत आहे आणि बेरोजगारीचा दर कमी आहे, त्यामुळे दरवाढ अटळच आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजार कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 3:45 AM