Join us

९.६ लाख कोटी बुडाल्याने घबराट, शेअर बाजारात आपटबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 5:31 AM

जागतिक बाजारांत घसरण झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारही मंगळवारी जोरदार आपटले. या घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे मूल्य २.७२ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक बाजारांत घसरण झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारही मंगळवारी जोरदार आपटले. या घसरगुंडीमुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे मूल्य २.७२ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गेल्या ३ सत्रांत गुंतवणूकदारांनी ९.६ लाख कोटी रुपये गमावले आहेत. अमेरिकेचा उसनवाºयांचा खर्च वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात घसरगुंडी सुरू आहे. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटची विक्रमी घसरण झाली आहे.

भारतीय बाजारांना अर्थसंकल्पात शेअर बाजारातील मिळकतीवर लावण्यात आलेल्या दीर्घकालीन भांडवली लाभ कराचाही फटका बसला असून, याशिवाय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानेही बाजारात निराशा आहे.मंगळवारी बाजार सुरू होताच, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १,२७५ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९0 अंकांनी घसरला. त्यानंतर, बाजार थोडे सावरले. अखेरीस सेन्सेक्स ५६१.२२ अंकांनी घसरून ३४,१९५.९४ अंकांवर बंद झाला. निफ्टी १0,४९८.२५ अंकांवर बंद झाला. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हापासून सेन्सेक्स तब्बल १,७६९.0८ अंकांनी घसरला आहे. अर्थसंकल्पात वित्तीय तूट वाढणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने बाजारात निराशा आहे, असे सूत्रांनी सांगितले.