Share Market Today : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या 'मी तर बुडणारच, पण तुम्हालाही घेऊन जाणार' अशा मूडमध्ये असल्याचे दिसत आहेत. ट्रम्प टॅरिफ लागू झाल्यानंतर अमेरिकेसह जगभरातील शेअर मार्केट कोसळले आहेत. यातूनही भारतही अपवाद राहिला नाही. शुक्रवारी (४ एप्रिल २०२५) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. यामागे एक-दोन नव्हे तर चार कारणे आहेत. पण प्रामुख्याने जागतिक मंदीची भीती आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवीन दर यांचा बाजार खाली आणण्यात भूमिका होती. सेन्सेक्स ९३० हून अधिक अंकांनी तर निफ्टी ३४५ अंकांनी घसरला आहे. सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली, विशेषत: धातू, फार्मा आणि आयटी समभागांमध्ये मोठी घसरण झाली. फार्मा सेक्टरवर वेगळे दर लागू करण्याच्या चर्चेमुळे भारतीय औषध कंपन्यांचे स्टॉक्स घसरले.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०% मूलभूत शुल्क लागू करण्याची घोषणा केली. भारत (२६%), चीन (३४%), युरोपियन युनियन (२०%), दक्षिण कोरिया (२५%) आणि जपान (२४%) या देशांवर अतिरिक्त शुल्क लादले जाईल. यामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकते, त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक बाजारात मंदीची भीती
वॉल स्ट्रीटने २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण नोंदवली, ज्यामुळे आशियाई बाजारातही वेगाने विक्री झाली. जपानचा निक्केई निर्देशांक ३.४% घसरला, मार्च २०२० च्या कोविड क्रॅशनंतरचा हा सर्वात वाईट आठवडा होता. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले (गोल्ड, यूएस ट्रेझरी), ज्यामुळे शेअर बाजारांवर आणखी दबाव वाढला.
टॅरिफचा फटका फार्मा क्षेत्रालाही बसला
ट्रम्प यांनी फार्मास्युटिकल उत्पादनांवर स्वतंत्र टॅरिफ लादण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे भारतीय फार्मा कंपन्यांचे समभाग ७% घसरले. अरबिंदो फार्मा, लॉरस लॅब्स, आयपीसीए लॅबोरेटरीज, ग्लँड फार्मा आणि ल्युपिन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
वाचा - पेट्रोल-डिझेलनंतर आता 'पांढरे सोने', सौदी अरेबियाला मिळाला नवीन नैसर्गिक खजिना, पैशांचा पडणार पाऊस
दिग्गज शेअर्सही गडगडले
रिलायन्स इंडस्ट्रीजसह बड्या समभागांमध्ये घसरण झाल्याने बाजाराला आणखी धक्का बसला. निफ्टी फार्मा ६.२%), निफ्टी मेटल (५.३%), आयटी, ऑटो आणि रियल्टी क्षेत्रातील समभागातही २-४% ची घसरण नोंदवली गेली. जागतिक अनिश्चितता आणि व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.