Join us

शेअर बाजार गडगडला! निर्देशांकात ५३५ अंकांची घसरण; निफ्टीही कोसळला

By देवेश फडके | Published: January 28, 2021 5:10 PM

ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घातलेल्या शेअर बाजारात घसरण सुरू झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३५.५७ म्हणजेच १.१३ टक्क्यांनी घसरून ४६ हजार ८७४.३६ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकात १.०७ टक्के म्हणजेच १४९.९५ अंकांची घसरण होऊन तो १३ हजार ८१७.५५ अंकांवर बंद झाला.

ठळक मुद्देशेअर बाजाराचा निर्देशांक ५३५ अंकांनी कोसळलाकेंद्रीय अर्थसंकल्पाच्या संभ्रमामुळे नकारात्मक ट्रेण्डगेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

मुंबई : ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घातलेल्या शेअर बाजारात घसरण सुरू झाली आहे. मुंबईशेअर बाजाराचा निर्देशांक ५३५.५७ म्हणजेच १.१३ टक्क्यांनी घसरून ४६ हजार ८७४.३६ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकात १.०७ टक्के म्हणजेच १४९.९५ अंकांची घसरण होऊन तो १३ हजार ८१७.५५ अंकांवर बंद झाला. जागतिक स्तरावरील विविध निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली.

डिसेंबरनंतर पहिल्यांदाच शेअर बाजारातील व्यवहार ४७ हजारांखाली आल्याचे पाहायला मिळाले. विदेशी गुंतवणूकदारांच्या पुढाकाराने बाजारात वाढलेल्या विक्रीझोताने प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात तब्बल २ टक्क्यांनी आपटले. निफ्टीने लक्षणीय असा १४ हजाराचा स्तरही सोडला. जागतिक बाजारातील घसरण, कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल आणि गुंतवणूकदारांची नफावसुली यामुळे घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्पासंदर्भातील संभ्रमामुळे गुंतवणुकदारांकडून खरेदीऐवजी विक्रीला प्राधान्य दिले जात असल्याने शेअर बाजारात नकारात्कम ट्रेण्ड्स पाहायला मिळत आहे. हा ट्रेण्ड सरकारकडून अर्थसंकल्पामधून फारसे काही सकारात्कम मिळण्याची अपेक्षा नसल्याचे दर्शवतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

शेअर बाजारातील भारतीय स्टेट बँक, आयओसी, बीपीसीएल, अॅक्सिस बँक आणि गेल या कंपन्यांचे समभाग वाढलेले पाहायला मिळाले, तर विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुति, एचडीएफसी बँक आणि पॉवर ग्रीड या कंपन्यांच्या समभागात आज घसरण पाहायला मिळाली. क्षेत्रीय निर्देशांकांचा आढावा घेतल्यास बँकिंग आणि खासगी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये फार्मा, धातू, एफएमसीजी, फायनान्स सर्व्हिसेस, ऑटो, पीएसू बँक, मीडिया आणि रियल्टी आदी क्षेत्रांचा समावेश आहे.

दरम्यान, सकाळी निर्देशांक ३७७.९९ अंकांच्या घसरणीसह ४७,०३१.९४ अंकांवर उघडला. तर निफ्टीही ११३.१० अंकांच्या घसरणीसह १३ हजार ८५४.४० अंकांवर उघडला होता. तत्पूर्वी, २१ जानेवारी २०२१ रोजी निर्देशांकाने ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घालत ५० हजार १८४ अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीही १४ हजारांवर पोहोचला होता. 

टॅग्स :शेअर बाजारमुंबईनिफ्टी