Loksabha Election Result 2024 Share Market : मतमोजणीचा सुरुवातीचा कल शेअर बाजाराला फारसा रुचलेला दिसत नाही. बाजार मोठ्या घसरणीसह खुला झाला. सर्वात मोठी घसरण अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. काल बाजारात जेवढी तेजी होती, तितकीच घसरण आज दिसून येत आहे.
सकाळी ९.३० वाजता निफ्टीत जवळपास ६०० अंकांची घसरण दिसून आली होती. बँक निफ्टीत १५०० अंकांची मोठी घसरण पाहायला मिळत असली तरी सरकारी कंपन्यांच्या शेअर्समधील घसरण सर्वात मोठी आहे. शेअरबद्दल बोलायचे झाले तर एक्झिट पोलनुसार निकाल न लागल्यास बाजारात किंचित करेक्शन होण्याची शक्यता आहे. निफ्टी, बँक निफ्टी तब्बल ३ टक्क्यांनी घसरले.
अदानी समूहाला सर्वाधिक फटका
अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. अदानी पोर्ट्सचे शेअर्स ९ टक्के, अदानी पॉवरचे १० टक्के, अंबुजा सिमेंटचे १० टक्के, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १० टक्क्यांनी घसरले आहेत. एलआयसीमध्ये १० टक्के, एचएएलमध्ये १० टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. रिलायन्समध्ये ४.५ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)