मुंबई : वित्त संस्थांची (एनबीएफसी) रोख तरलता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांची कर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तामुळे फक्त ५० मिनिटांत मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स ११२८ अंकांनी गडगडला. या संस्थांच्या व्यवस्थापनानेच पडझड रोखण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे सेन्सेक्स ८४८ अंकांपर्यंत सावरला गेला, पण या दरम्यान गुंतवणूकदारांचे सुमारे २ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. आठवडाभराच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजार व राष्टÑीय शेअर बाजारात शुक्रवारी सकाळच्या सत्रात उत्साह होता. पहिल्या दोन तासांत सेन्सेक्स ३६८ अंकांनी वधारुन ३७,४८९ अंकांपर्यंत पोहोचला होता. पण त्यानंतर एनबीएफसी क्षेत्र संकटात असल्याचे वृत्त आले. त्यातून बाजार एकाएकी गडगडला. गृह क्षेत्राला वित्त साहाय्य देणाऱ्या डीएचएफएल या वित्त संस्थेने आयएल अॅण्ड एफएस कंपनीचे कर्ज बुडवले. या कर्जाचा भरणा करण्यासाठी डीएसपी म्युच्युअल फंडाने डीएचएफएलच्या रोख्यांची सवलतीच्या दरात विक्री केली, असे वृत्त बाजारात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास पसरले. त्यामुळे डीएचएफएलच्या शेअर्समध्ये ४५ टक्के घसरण झाली. त्याचवेळी आयएल अॅण्ड एफएसनेही १०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नसल्याने कंपनी रिझर्व्ह बँकेच्या रडारवर असल्याचे वृत्त बाजारात येऊन धडकले.या दोन वृत्तांमुळे एनबीएफसींच्या समभागांची जोरदार विक्री होऊन दुपारी १ वाजताच्या सुमारास सेन्सेक्स ३५,९९३ अंकांपर्यंत घसरला. पण त्यानंतर एनबीएफसींच्या व्यवस्थापनानेच हस्तक्षेप करीत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स ३६,८४१ अंकांवर बंद झाला.राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक शुक्रवारी ११,२७१ अंकांवर उघडला. १२ वाजताच्या सुमारास तो ११,३४६ वर गेला. त्यानंतर त्यात ४६६ अंकांची घसरण झाली. दिवसअखेर निफ्टी ११,१४३ वर बंद झाला. डीएचएफएलने कुठलेही कर्ज किंवा रोखे बुडविलेले नाही. कंपनीचा आयएल अॅण्ड एफएससंबंधी कुठलाही वाद नाही, असे डीएचएफएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांनी स्पष्ट केले आहे.
कर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तानं शेअर बाजारात भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 6:45 AM