मुंबई : ठोक मूल्यांक आधारित महागाईचा पारा खाली आल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक व्याजदरात कपात होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याने भारतीय शेअर बाजारात उत्साहाला उधाण आले. गुंतवणूकदारांनी मनसोक्त खरेदी केल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठी झेप घेतली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) शुक्रवारच्या सत्रात दिवसअखेर ५१७.७८ अंकांनी झेपावत २८,०६७.३१ वर पोहोचला. २० जानेवारीनंतरची ही सर्वात मोठी झेप होय. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १६२.७० अंकांनी उसळी घेत ८,५१८.५५ वर गेला. १५ जानेवारीनंतर निफ्टीने एकाच दिवसात गाठलेला हा उच्चांक होय. व्याजदराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या स्थावर मालमत्ता, बँकिंग आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी जोमाने खरेदी केली. वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) एप्रिल २०१६ पासून लागू करण्याचा निर्धार सरकारने केल्याने शेअर बाजाराला बळ मिळाले.याशिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरत सहा वर्षांतील सर्वांत नीचांक पातळीवर आल्याने गुंतवणूकदार सुखावले.आशियातील बाजारात मात्र संमिश्र वातावरण होते.