हिंडनबर्गचा रिपोर्ट आणि अडानी ग्रुप यांच्यातील वादामुळे गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराची फजिती उडाली आहे. शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. शेअर बाजारातील मोठे बाजार भांडवल असलेल्या बहुतांश कंपन्यांना याचा फटका बसताना दिसत आहे. मात्र, अशा स्थितीतही टाटा समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) शेअर्सची कामगिरी आश्चर्यचकित करणारी आहे.
काय आहे शेअरची किंमत -
TCS चे शेअर शुक्रवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर सात महिन्यांच्या उच्च पातळीवर म्हणजेच 3,498 रुपयांवर पोहोचले होते. ट्रेडिंगदरम्यान 1 टक्का तेजी दिसून आली. आज सलग तिसऱ्या दिवशीही TCS चे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली. केवळ तीन ट्रेडिंग दिवसांत TCS चे शेअर 4 टक्क्यांनी वधारले आहेत. 18 मे, 2022 नंतर, TCS चे शेअर या पातळीवर पोहोचले आहेत.
गेल्या एका महिन्यातील एसअँडपी बीएसई सेंसेक्समधील 1.8 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत टीसीएसच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांतील सेंसेक्स इंडेक्समधील 1 टक्का घसरणीच्या तुलनेत टीसीएस च्या शेअरने 9 टक्के परतावा दिला आहे.
महत्वाचे म्हणजे, टीसीएसने डिसेंबर तिमाहीत 58,229 कोटी रुपयांच्या महसुलाची माहिती दिली. या तिमाहीत कंपनीचा नफा 11 टक्क्यांनी वाढून 10,846 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.