- प्रसाद गो. जोशी
जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण आणि भारतामधील उत्तरोत्तर सुधारत असलेली स्थिती यामुळे गुंतवणूकदारांची बाजारावरील विश्वास वाढत आहे. त्यातच देशातील सण, उत्सवांच्या काळामुळे बाजारातही उत्सवाचे वातावरण दिसून आले. त्याचाच परिणाम निर्देशांकाने पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली आहे. आगामी काळामध्ये सणावारांमुळे उत्सवी वातावरण राहणार असून, मोठ्या आणि किंमती वस्तुंची खरेदी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाहन, वस्त्रोद्योग, बांधकाम या क्षेत्रांवर लक्ष देणे फायद्याचे ठरू शकते.
६.७६ लाख कोटी रुपयांनी मालामाल
- बाजारामध्ये गतसप्ताह हा तेजीचा राहिला. सप्ताहात संवेदनशील निर्देशांकाने सुमारे २५०० अंशांनी भरारी घेतल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. सप्ताहामध्ये बाजारातील भांडवलमूल्य ६,७६,४६५.१३ कोटी रुपयांनी वाढले आहे. पहिल्या दहा कंपन्यांमधील रिलायन्सच्या भांडवलमूल्यामध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, इन्फोसिस आणि टायटन यांचा क्रमांक लागतो.
- परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये ३६८५.६५ कोटी रुपयांची विक्री केली आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत वित्तसंस्थांनी बाजार वाढत असतानाही ३४५८.०५ कोटी रुपयांची खरेदी केली.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे जाहीर होणारे निकाल, औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीबाबतची आकडेवारी तसेज जगभरातील शेअर बाजारांमधील कल यावर बाजारातील स्थिती अवलंबून राहणार आहे.