Join us  

शेअर बाजाराची कमाल! ७१ हजार कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत; उत्साह वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 8:06 AM

शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याने गुंतवणूकदारांची श्रीमंती वाढली आहे.

प्रसाद गो. जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: रशिया-युक्रेन युद्धामध्ये सुरू असलेली चर्चा आणि चीनमधील कोविड रुग्णांची वाढती संख्या यावर बाजाराचे लक्ष असून, तेथील कोणतीही कमी-जास्त बातमी बाजाराची चाल बिघडवू शकते. दरम्यान, गतसप्ताहामध्ये कमी झालेले खनिज तेलाचे दर, परकीय वित्तसंस्थांकडून झालेली खरेदी यामुळे शेअर बाजारामध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. 

शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याने गुंतवणूकदारांची श्रीमंती वाढली आहे. गतसप्ताहामध्ये बाजाराचे भांडवलमूल्य ७१,९२९.२४ कोटी रुपयांनी वाढून २,६०,३७,७३०.७८ काेटी रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहाला उधाण येऊ लागणार आहे.

रशिया - युक्रेन युद्धामध्ये सध्या सुरू असलेल्या चर्चेतून काही तोडगा निघाल्यास बाजारावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्याचमध्ये चीनमध्ये वाढीस लागलेली कोविड रुग्णांची संख्या ही बाजारासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामध्ये येत्या सप्ताहामध्ये ज्या काही घडामोडी घडतील, त्यानुसार बाजार वर अथवा खाली जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गत सप्ताहामध्ये बाजाराने सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ नोंदविली आहे. सुमारे दहा सप्ताहानंतर परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारामध्ये खरेदी केली आहे. गतसप्ताहात त्यांनी १६८५.८७ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली, तसेच देशांतर्गत वित्तीय संस्थांनी १२९०.९७ कोटी रुपयांची खरेदी करून त्यांना चांगली साथ दिली. या खरेदीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साहही काहीसा वाढला आहे.

रिलायन्सचे भांडवलमूल्य १६,७७,४४७.३३ कोटींवर

बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये सप्ताहाच्या अखेरीस वाढ झाली आहे. या वाढीचे नेतृत्व रिलायन्स इंडस्ट्रीजने केले. या कंपनीचे भांडवलमूल्य आता १६,७७,४४७.३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर टीसीएस दुसऱ्या तर एचडीएफसी बँक तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, वाढीचा विचार करता इन्फोसिसमधील वाढ तिसऱ्या क्रमांकाची आहे. 

टॅग्स :शेअर बाजार