मुंबई : शेअर बाजारात सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी जबदरस्त तेजी दिसून आली. सेन्सेक्स १,९६१ अंकांनी उसळून पुन्हा ७९,००० अंकांचा टप्पा पार करीत ७९,११७ अंकांवर बंद झाला. निफ्टीही ५५७ अंकांनी वधारून २३,९०७ अंकांवर बंद झाला. एका टप्प्यावर सेन्सेक्सने २००० अंकांपेक्षा अधिक उसळी घेतली होती. मागील पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी तेजी ठरली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.१५ लाख कोटींची भर पडली आहे.
गुरुवारी अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर झालेल्या कथित लाच देणे आणि फसवणुकीच्या आरोपानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. पण शुक्रवारी अदानी समूहातील बहुतेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.
गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स ४२२ अंकांनी घसरून ७७,१५५ अंकांवर बंद झाला होता तर निफ्टी १६८ अंकांनी घसरून २३,३४९ अंकांवर स्थिरावला होता.
गुंतवणूकदार झाले श्रीमंत
बाजारात सूचिबद्ध अससेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी वाढून ४३२.५३ लाख कोटींवर पोहोचले. गुरुवारी हेच भांडवल ४२५.३८ लाख कोटी इतके होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात ७.१५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
कोणते शेअर्स वाढले?
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २९ वाढीसह बंद झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे समभाग ४.३४ टक्के वाढले. आयटीसी, टायटन, इन्फोसिस, टीसीएसचे शेअर्सही वाढले. केवळ एचडीएफसी बँकेचे समभाग किरकोळ प्रमाणात घसरले.
शुक्रवारी बाजारात ४,०४१ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यातील २,४५२ शेअर्समध्ये वाढ झाली तर १,४६९ शेअर्स घसरले. १२० समभाग वाढ किंवा घट न होता स्थिर राहिले. यापैकी १६३ समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक सर केला तर १०७ शेअर्सनी ५२ आठवड्यांतील सर्वात कमी उंची गाठली.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी ५,३२० कोटींच्या शेअर्सची विक्री केली तर घरगुती गुंतवणूकदार संस्थांनी ४,२०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.
दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई वाढले तर चीनचा कंपोझिट आणि हाँगकाँगचा हेंगसेंग घसरले. युरोपातील बाजारही घसरले. अमेरिकेन बाजार वाढीसह बंद झाले.