Stock Market, Sensex Record: देशाच्या दोन्ही शेअर बाजारांनी विक्रमी झेप घेत ऐतिहासिक उच्चांकी मजल मारली. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्सनं आज बाजार सुरू होताच १४० अंकांची झेप घेत ५७ हजारांचा आकडा गाठला आहे. तर निफ्टी देखील १७ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. (Stock market live update Sensex crossing 57000 for the first time)
मुंबई शेअर बाजारात सध्या सेन्सेक्स ५७,०११.२१ अंकांवर तर निफ्टी १६,९६१ अंकांवर आहे. सेन्सेक्समध्ये आज भारती एअरटेलच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.४३ टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टीसीएस, टायटन, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे इंडसइंड बँक, एमअँडएम, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सीस बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घट नोंदविण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मकतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. या तेजीमुळे गुंतवणूकदार एकाच दिवसात साडे तीन लाख काेटी रुपयांनी मालामाल झाले आहेत.
वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांसह धातू कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. एकूणच जागतिक बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांमध्ये तेजी आहे. वित्तीय क्षेत्रापाठोपाठ धातू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली तेजी होती. आशिया आणि युरोपमधील सर्वच शेअरबाजारांमध्ये तेजी दिसून आली.