- प्रसाद गो. जोशीकर्नाटकातील राजकीय घडामोडींमुळे बाजारावर दाटलेली निराशा, त्यातच तामिळनाडूमधील हिंसाचारामुळे उद्योग क्षेत्रामध्ये असलेले चिंतेचे वातावरण यामुळे संपूर्ण सप्ताह हा अस्थिर वातावरणाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे वाढते दर आणि घसरत असलेले रुपयाचे मूल्य यामुळेही गुंतवणूकदार सावध होते. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या मोठ्या खरेदीने सप्ताहाची सांगता वाढीने झालेली दिसली.मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ थोड्याशा तेजीने झाला. बाजाराचा निर्देशांक ३४८७३.१६ अंकांवर खुला झाला. त्यानंतर, त्याने ३५०१७.९३ ते ३४३०२.८९ अंशांदरम्यान आंदोलने घेतली. सप्ताहाच्या अखेरीस तो ३४९२४.८७ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये अवघी ७६.५७ अंशांची म्हणजेच ०.२२ टक्क्यांची वाढ झाली.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अवघ्या ८.७५ अंशांनी (०.०८टक्के) वाढून १०६०५.१५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅपमध्ये वाढ तर स्मॉलकॅपमध्ये सलग चौथ्या सप्ताहामध्ये घसरण झाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप १५९०४.४१ तर स्मॉलकॅप १७१५१.४३ अंशांवर बंद झाला. कर्नाटकातील सत्तानाट्यामुळे बाजारात अस्थिरता कायम होती. त्यातच तामिळनाडूतील एका प्रकल्पावरून झालेल्या हिंसाचारामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. अमेरिकेतील व्याजदरामध्ये वाढ होण्याची शक्यता वाढल्याने परकीय वित्तसंस्थांनी आपले विक्रीचे धोरण कायम राखले आहे. काही आस्थापनांचे चांगले आलेले निकाल आणि हातात असलेला पैसा यामुळे देशांतर्गत परस्पर निधींनी सप्ताहाच्या अखेरीस मोठी खरेदी केल्याने निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला.आंतराष्टÑीय बाजारातील खनिज तेलाचे वाढते दर आणि अमेरिका चीन व्यापार, तसेच अमेरिकन अध्यक्षांनी उत्तर कोरियाच्या राष्टÑाध्यक्षांबरोबर रद्द केलेली बैठक, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही निराशाच होती.परकीय चलनाच्या गंगाजळीत घट- देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये २.६४८ अब्ज डॉलरची घट होऊन, ती आता ४१५.०५३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. १८ मे रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये गंगाजळीत घट झाल्याचे दिसून आले आहे. परकीय चलनाची खरेदी आणि विक्री, परकीय चलन गंगाजळीतील मालमत्तेचे फेरमूल्यांकन आणि सरकारला मिळणारी परकीय मदत यांच्यामुळे या गंगाजळीमध्ये असलेली शिल्लक कमी अथवा जास्त होत असते.- आंतरराष्टÑीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने, देशात आयात होणाऱ्या खनिज तेलासाठी अधिक परकीय चलन खर्च होत आहे. त्याचाही परिणाम या गंगाजळीवर झाला आहे.- देशातील सोन्याच्या राखीव साठ्यामध्ये मात्र याच काळामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. सोन्याच्या साठ्यामध्ये १३ दशलक्ष डॉलरने वाढ होऊन तो २१.७० अब्ज डॉलर एवढा झाला आहे.
अस्थिर वातावरणानंतरही सप्ताहाची सांगता वाढीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:37 AM