मुंबई : अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांच्या घसरणीचा तसेच रिझर्व्ह बॅँकेने येस बॅँकेवर लादलेल्या निर्बंधांमुळे शुक्रवारी शेअर बाजाराचा निर्देशांक १४५० अंशांपेक्षा अधिकच खाली गेल्याने गुंतवणूकदारांचे सुमारे ४.४२ लाख कोटी रुपयांचे भांडवल बुडाले. यानंतर बाजार काहीसा सावरला तरी दिवसअखेर त्यामध्ये ८९४ अंशांची घट राहिलीच. निफ्टीही ११ हजारांच्या खाली घरंगळला.कोरोनामुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये घबराट आहे. प्रत्येक ठिकाणीच निर्देशांक खाली आले आहेत. त्याचा परिणाम झाल्याने शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक गडगडला. दिवसअखेर निर्देशांक ३७,५७६.६२ अंशांवर बंद झाला. निफ्टिीही २७९.५५ अंशांनी खाली येऊन १०,९८९.४५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप व स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घट झाली. येस बॅँकेवर लादलेल्या निर्बंधांचा परिणाम बॅँकेच्या समभागांच्या किमती ५५ टक्क्यांहून अधिक घसरल्या. या बॅँकेवरील निर्बंध वित्तीय क्षेत्राच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याने सर्वच बॅँकांच्या समभागांमध्ये जोरदार घसरण झाली.>गुंतवणूकदारांचे नुकसानशेअर बाजार सुरू होताच पहिल्याच मिनिटाला निर्देशांक ३७,०११.०९ वर आला. त्यामुळे बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व समभागांचे बाजार भांडवलमूल्य १४७.५९ लाख कोटींवरून १४३.१७ लाख कोटी रुपयांवर आले. मिनिटभरात गुंतवणूकदारांची संपत्ती ४.४२ लाख कोटींनी घटली. त्यांचे नुकसान प्रत्यक्षात नव्हे, तर कागदोपत्री असते. बाजार वाढल्यानंतर पुन्हा किंमत वाढून गुंतवणूकदारांचे बाजार भांडवलमूल्य बदलू शकते. जे रोजच्या रोज खरेदी-विक्री करून नफा कमविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मात्र फटका बसू शकतो, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फार फटका बसत नाही.>अमेरिकेतील घसरण कारणीभूतशेअर बाजाराच्या शुक्रवारच्या घसरणीला अमेरिकन बाजारांमध्ये गुरुवारी झालेली घसरण कारणीभूत असल्याचे मानले जाते आहे. अमेरिका शिंकते, तेव्हा जगाला सर्दी झाल्यासारखे वाटू लागते, असे म्हटले जाते. कोरोनचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची भीती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. त्यापाठोपाठ फेडरल रिझर्व्हने आपल्या १७-१८ मार्चच्या निर्धारित बैठकीच्या पूर्वीच व्याजदरामध्ये ०.५० टक्के कपात जाहीर केली. यामुळे जगातील अव्वल क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा जोरदार फटका बसणार असल्याचे मानले जाऊ लागले. त्याचे पडसाद जगभर उमटले.
शेअर बाजारातील घसरणीमुळे बुडाले ४.४२ लाख कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:44 AM