लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले सकारात्मक वातावरण आणि माहिती तंत्रज्ञान, खासगी बँका आणि एफएमसीजी या कंपन्यांच्या शेअर्सना असलेली जोरदार मागणी यामुळे शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण राहिले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक उसळून त्याने ५१ हजारांची तर निफ्टीने १५ हजारांची पातळी ओलांडली आहे.
मुंबई शेअर बाजारामध्ये सकाळपासूनच तेजीचे वातावरण होते. येथील संवेदनशील निर्देशांक वाढीव पातळीवर खुला झाल्यानंतर नफा वसुलीसाठी झालेल्या विक्रीमुळे ५०,३९६ अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र उत्तरार्धामध्ये माहिती तंत्रज्ञान, खासगी बँका आणि एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी आल्याने बाजार सुधारला. बाजार बंद होताना संवेदनशील निर्देशांक ५८४.४१ अंशांनी वाढून ५१,०२५.४८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही सर्वसाधारणपणे तेजीचे वातावरण राहिले. येथील निर्देशांक (निफ्टी) १४२.२० अंशांनी वाढून १५,०९८.४० अंशांवर बंद झाला आहे. युरोपमधील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण दिसून आले.