मुंबई : जागतिक पातळीवर आर्थिक वाढीबाबत व्यक्त होत असलेली चिंता आणि असमाधानकारक मायक्रोइकॉनॉमिक्स डाटा यामुळे भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५६.४२ अंकांनी घसरून २५,६१0.५३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा दोन महिन्यांचा नीचांक ठरला. दिवाळीच्या मुहूर्त सौद्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्रात शेअर बाजार तेजाळले होते. त्यानंतरच्या पहिल्याच सत्रात मात्र त्यांनी पुन्हा एकदा गटांगळी खाल्ली आहे. गेल्या ७ दिवसांतील हे घसरणीचे सहावे सत्र ठरले आहे. जागतिक पातळीवर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती अनेक वर्षांच्या नीचांकावर गेल्या आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त होत आहे. याचा परिणाम म्हणून आशियाई आणि युरोपीय बाजारांत मोठी घसरण पाहायला मिळाली. भारतीय बाजारांना मात्र मायक्रो इकॉनॉमिक डाटाचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले. काल जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारताचे औद्योगिक उत्पादन ३.६ टक्क्यांनी घसरून चार महिन्यांच्या नीचांकावर गेले आहे. किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. बीएसई सेन्सेक्स संपूर्ण दिवसभर नकारात्मक टापूत राहिला. एका क्षणी तो २५,५४0.७३ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस २५६.४२ अंकांची अथवा 0.९९ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २५,६१0.५३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २२ कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. तत्पूर्वी बुधवारी संवत २0७२ च्या मुहूर्ताच्या सत्रात सेन्सेक्स १२३.६९ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ७,८00 अंकांच्या खाली आला आहे. ६२.७५ अंकांची अथवा 0.८0 टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ७,७६२.२५ अंकांवर बंद झाला.
जागतिक वृद्धीच्या चिंतेने शेअर बाजार पुन्हा घसरला
By admin | Published: November 14, 2015 1:34 AM