Join us

शेअर बाजारात तेजीचा सातवा दिवस

By admin | Published: February 20, 2015 1:00 AM

भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी सलग सातव्या दिवशी तेजी साजरी केली. मुंबई शेअर बाजार १४२ अंकांनी वाढून २९,४६२.२७ अंकांवर बंद झाला.

मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी गुरुवारी सलग सातव्या दिवशी तेजी साजरी केली. मुंबई शेअर बाजार १४२ अंकांनी वाढून २९,४६२.२७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६.२0 अंकांनी वाढून ८,८९५.३0 अंकांवर बंद झाला. महागाईचा पारा खाली आल्यानंतर अर्थसंकल्पात धोरणात्मक व्याजदरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे, असे बाजाराशी संबंधित सूत्रांनी सांगितले. जिंदाल स्टील आणि पॉवरच्या समभागांना सर्वाधिक २५.६ टक्क्यांचा लाभ झाला. जिंदाल पॉवरला छत्तीसगढमध्ये दोन कोळसा खाणी मिळाल्यामुळे कंपनीचे समभाग वाढले. सेन्सेक्स सकाळी २९,४३४.९१ अंकांवर तेजीसह उघडला. मजबूत खरेदीच्या जोरावर तो २९,५२२.८६ अंकांपर्यंत वर चढला होता. नंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्याने तो थोडासा खाली आला. सत्र अखेरीस तो २९,४६२.२७ अंकांवर बंद झाला. १४२.0१ अंकांची वाढ त्याने नोंदविली. ही वाढ 0.४८ टक्के आहे. गेल्या सात दिवसांत सेन्सेक्सने १,२३४.८८ अंक कमावले आहे. ४.३७ टक्क्यांची ही वाढ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५0 कंपन्यांवर आधारित निफ्टी २६.२0 अंकांनी अथवा 0.३0 टक्क्यांनी वाढून ८,८९५.३0 अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारातही तेजीचा कल दिसून आला. जपानमधील बाजारांनी अभूतपूर्व तेजी पाहिली. निक्केई २२५ अंकांनी अथवा 0.३६ टक्क्यांनी वाढला. सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.१६ टक्के ते 0.५८ टक्के वर चढले. चीनचे बाजार नव्या चंद्र वर्षाच्या सुटी निमित्ताने बंद होते. भारतीय बाजारांत काल विदेशी गुंतवणूकदारांनी २,१८७.९६ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. स्वदेशी गुंतवणूकदारांनी ३२७.८७ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. बाजारात सादर करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीवरून हे कल समोर आले. युरोपीय बाजारांत संमिश्र कल दिसून आला. फ्रान्स आणि जर्मनी येथील बाजार 0.0५ टक्के ते 0.११ टक्के वर चढले. ब्रिटनचा एफटीएसई मात्र 0.१२ टक्के घसरला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 पैकी २0 कंपन्यांचे समभाग वर चढले. १0 कंपन्यांचे समभाग घसरले. तेजीचा लाभ मिळालेल्या बड्या कंपन्यांत सेसा स्टरलाईट, हिंदाल्को, टाटा पॉवर, टाटा स्टील आणि एमअँडएम यांचा समावेश आहे. एलअँडटी, एचडीएफसी, टीसीएस, भारती एअरटेल, इन्फोसिस, कोल इंडिया, मारुती सुझुकी यांचे समभागही वाढले. घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत विप्रो, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांचा समावेश आहे. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५0८ कंपन्यांचे समभाग घसरले. १,३७९ कंपन्यांचे समभाग वर चढले. १0२ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घसरून ३,८७६.१२ कोटी झाली. आदल्या दिवशी ती ४,१६२.0६ कोटी होती.