- प्रसाद गो. जोशी मोठ्या प्रमाणामध्ये महागाईच्या वाढीची आणि जागतिक मंदीची भीती, वाढणारे व्याजदर, काही देशांमध्ये वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण यामुळे गतसप्ताहात जगभरातील शेअर बाजार कोसळून आणखी खाली आले. परिणामी, भारतीय गुंतवणूकदारांचे १५ लाख ६ हजार ५४२ कोटी रुपयांचे भांडवल बुडाले. आगामी सप्ताहातही जगभरातील वातावरण, खनिज तेलाच्या किमती यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे.गतसप्ताह हा भारतीय शेअर बाजारासाठी गेल्या वर्षभरातील वाईट सप्ताह ठरला. त्यात दोन्ही प्रमुख निर्देशांक सुमारे ६ टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स २९४३.०२ अंश, तर निफ्टी ९०८.३० अंशांनी खाली आले. बाजाराच सेन्सेक्स ५० हजारांची पातळी गाठतो की काय अशी भीती काहीजण व्यक्त करू लागले आहेत. परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणातील विक्री कायम राखली आहे. जून महिन्यात त्यांनी बाजारातून ३१,४५३ कोटी रुपये काढून घेतले आहेत. मात्र देशांतर्गत वित्तसंस्थांनी याच काळामध्ये ३०,३१२ कोटी रुपये बाजारात टाकले आहेत.
नेमके काय घडले?- भारतामधील औद्योगिक उत्पादनामध्ये एप्रिल महिन्यात चांगली वाढ.- अमेरिकेतील व्याजदरांमध्ये मोठी वाढ. आगामी काळातही दरवाढीचे संकेत.- युरोपच्या मध्यवर्ती बँकेकडून बॉण्ड खरेदी थांबविली जाण्याचे संकेत.- बँक ऑफ इंग्लंडने लवकरच व्याजदर वाढविण्याची केलेली घोषणा.- आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या दरामध्ये झाली वाढ.- भारतामध्ये कोविडच्या रुग्णांची वाढत असलेली संख्या.- देशाच्या बऱ्याच भागामध्ये मान्सूनने वटारले डोळे.
एलआयसी, टीसीएसला मोठे नुकसानगेल्या आठवड्यात शेअर बाजारातील प्रमुख १० कंपन्यांचे बाजार भांडवल तब्बल ३.९१ लाख कोटी रुपयांनी घटले आहे. सर्वाधिक नुकसान टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांना झाले आहे. टीसीएसचे बाजार भांडवल तब्बल १,०१,०२६.४ कोटी रुपयांनी कमी होत ११,३०,३७२.४५ कोटी रुपयांवर तर रिलायन्स इंडस्ट्रीजे बाजार भांडवल ८४,३५२.७६ कोटी रुपयांनी कमी होत १७,८३,८४६.०१ काेटी रुपयांवर आले आहे. तर एलआयसीचे भांडवल ४,१४,०९७.६० कोटी रुपयांवर आले आहे.