Join us  

शेअर बाजारातील विक्री कायम; ५ वर्षांत जे गुंतवले ते ८ महिन्यांत काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 10:40 AM

२०२२ या एका वर्षात तब्बल १.६९ लाख कोटी रुपये तर ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ पर्यंतच्या आठ महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल २.०७ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.

- प्रसाद गो. जोशी

परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय शेअर बाजारातील विक्री कायम आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात ४० हजार कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. गेल्या ५ वर्षांत जे समभाग खरेदी केले ते समभाग केवळ ८ महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी विकले आहेत. २०२२ या एका वर्षात तब्बल १.६९ लाख कोटी रुपये तर ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ पर्यंतच्या आठ महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल २.०७ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.

गत सप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ८८४.५७, तर निफ्टी २३१.८५ अंशांनी वाढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनीही वाढ दाखविली. सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजार वाढला. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जाहीर झालेली चांगली आकडेवारी बाजाराच्या वाढीला कारणीभूत ठरली आहे. या सप्ताहात परकीय वित्तसंस्थांच्या खरेदी-विक्रीनुसार बाजाराचा कल ठरू शकेल.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील प्रमुख १० मधील चार कंपन्यांचे बाजार भांडवल २.३१ लाख कोटी रुपयांनी वाढले आहेत. क्रूड ॲाईल मोठ्या प्रमाणात बाजारात उतरवण्यास ओपेकने मान्यता दिल्याचा फायदा म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सर्वाधिक फायद्यात राहिला. गेल्या आठवड्यात निर्देशांक ८८४.५७ अंक म्हणजेच १.६१ टक्क्यांनी वाढला आहे.

या आठवड्यात काय होईल?सलग तिसऱ्या सप्ताहात बाजाराने वाढ दिल्यानंतर बुधवारी जाहीर होणारे रिझर्व्ह बँकेचे पतधोरण हे बाजाराची दिशा निश्चित करण्याची शक्यता आहे. याशिवाय युरोपियन सेंट्रल बँकेची बैठक, अमेरिकेतील बेरोजगारी, चीनमधील महागाईचा दर या आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणामही बाजारावर होणार आहे.

टॅग्स :शेअर बाजार