मुंबई : गेले काही दिवस सातत्याने नवनवीन उच्चांक गाठत असलेल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकांना ब्रिटनमध्ये वाढलेल्या कोरोना व्हायरसने चांगलाच हादरा दिला. ब्रिटनमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी विक्री होऊन बाजार खाली आला. दिवसअखेर सेन्सेक्स १,४०० अंशांनी खाली आला. बाजाराने गेल्या सात महिन्यांमधील मोठी घसरण अनुभवली. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांची सुमारे सात लाख कोटी रुपयांची संपत्ती बुडाली आहे.
नेमके काय झाले?
- ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, युरोपसह अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी विमाने रद्द केली, तसेच ब्रिटनमधून आपल्या देशात येण्यावरही बंधने लागू केली. याचा परिणाम सोमवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीच्या स्वरूपामध्ये दिसून आला.
- मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे २०० अंशांनी खाली येऊन खुला झाला. त्यानंतर, बाजारावर विक्रीचे दडपण वाढत गेले. त्यामुळे संवेदनशील निर्देशांक मोठ्या प्रमाणावर खाली गेला. एका वेळी तर संवेदनशील निर्देशांक २,०३७ अंशांनी घसरला होता.
अखेरच्या दोन तासांमध्ये गुंतवणूकदारांना मोठा फटका
-शेअर बाजारामध्ये सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजाराच्या भांडवल मूल्यामध्ये
६.५९ लाख कोटी रुपयांची घट झाली असून, गुंतवणूकदारांचा प्रचंड तोटा झाला आहे.
- शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य १८५.३६ लाख कोटी रुपये होते. ते सोमवारी १७८.७९ लाख कोटींपर्यंत खाली आले.
- बाजारातील २४३३ आस्थापनांचे समभाग हे खाली येऊन बंद झाले. २२४ कंपन्यांचे समभाग ५२ आठवड्यांमधील नीचांकी मूल्यावर आले आहेत.