गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. परदेशी गुंतवणूदारांनीही मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत. दरम्यान, यानंतर किरकोळ गुंतवणूकदारांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परंतु यावर मार्केट एक्सपर्ट आणि मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे चेअरमन रामदेव अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "इंडिया इंकच्या अर्निंगमध्ये नक्कीच सुस्ती आहे परंतु हा टप्पा तात्पुरता आहे आणि परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात परततील," असं अग्रवाल म्हणाले.
"अर्निंगमध्ये सुस्ती आहे. परंतु याच्या रिकव्हरीसाठी आव्हान आहे. याला सहा महिन्यांची वेळही लागू शकते, परंतु ते होईल. आम्हाला फिस्कल किंवा मॉनिटरीच्या मदतीची नक्कीच गरज आहे आणि ती मिळेलही. थोडा धीर धरणं आवश्यक आहे. आज परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत, पण जेव्हा ते खरेदीसाठी परत येतील तेव्हा त्यांना आधीच्या किंमतीवर काही मिळणार नाहीत. ते परत आले तर निफ्टी निर्देशांक ३०,००० च्या आसपास असेल," असं रामदेव अग्रवाल म्हणाले. सीएनबीसी टीव्ही १८ ग्लोबल लीडरशीप समिटमध्ये त्यांनी यावर वक्तव्य केलं.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा
भारतात गेल्या ६-७ आठवड्यांपासून फॉरेन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सद्वारे विक्रीचा सपाटा सुरू आहे. काही गुंतवणूकदार एकीकडे चीनमध्ये पैसा गुंतवत आहेत, तर काही जण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर तिथल्या शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. ट्रम्प यांच्या वक्तव्यांवरून क्रिप्टोकरन्सीमध्येही तेजी दिसून येत आहे. तर दुसरीकडे भारतात कंपन्यांचे निकाल मूल्यांकनाप्रमाणेही नसल्याचं दिसून येत आहे.
धीर सर्वात महत्त्वाचा
"शेअर बाजारात भागीदारीसाठी धीर ही महत्त्वाची बाब आहे. तुमची गुंतवणूक कायम ठेवा हा आणखी एक सल्ला आहे," असंही अग्रवाल म्हणाले.