मुंबई - मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात असलेली तेजी कायम असून मंगळवारी सकाळी बाजार उघडताच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने प्रथमच 11 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टी 11,018 अंकांवर पोहोचला. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी रोज नवनवे उच्चांक नोंदवत आहे. बीएसई सेन्सेक्स 214 अंकांची उसळी घेत 36 हजार पार पोहोचला.
कालही बाजार खुलताच क्षणी सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, तर निफ्टीनंही 10910 या नव्या आकड्याला गवसणी घातली होती. जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण, आगामी अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा, परकीय, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध आस्थापनांकडून आगामी काळामध्ये जाहीर होणारे निकाल यामुळे शेअर बाजार तेजीत आहे.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह तेजीचाच राहिला. बाजार सतत ७ आठवडे वाढीव पातळीवर बंद झाला असून, गेल्या सहा वर्षांमधील ही सर्वोच्च कामगिरी आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत काही वस्तूंवरील कराचा दर कमी करण्याचा झालेला निर्णय बाजाराला चालना देणारा ठरला. आगामी अर्थसंकल्पामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून, बाजारात या क्षेत्राचे समभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचप्रमाणे, विविध आस्थापनांचे तिमाही निकाल समाधानकारक असल्याने बाजार वाढला आहे. परकीय वित्तसंस्थांनीही भारतीय बाजारात मोठी खरेदी केली आहे. चालू महिन्यात या संस्थांनी ८७०० कोटी रुपये भारतीय बाजारामध्ये गुंतविले आहेत.