- प्रसाद गो. जोशी
अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेली जोरदार सुधारणा, कोरोनावरील लस लवकर येण्याची निर्माण झालेली शक्यता, रिझर्व्ह बँकेने कायम राखलेले दर आणि परकीय वित्तसंस्थांची जोरदार खरेदी यामुळे बाजाराच्या निर्देशांकांनी गतसप्ताहात नवीन उच्चांक नोंदविले. आगामी काही काळ बाजार तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. आता बाजाराचे लक्ष्य हे निफ्टीचे १५ हजार आणि सेन्सेक्सचे ५० हजार याकडे लागले आहे.
गतसप्ताहात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. सेन्सेक्स ४४,४३५.८३ अंशांवर, तर निफ्टीने १३,२८०.०५ या नवीन उच्चांकापर्यंत धडक मारली. अनुकूल असलेले आंतरराष्ट्रीय वातावरण आणि बाजारात खरेदीदारांची असलेली गर्दी यामुळे जवळपास सर्वच निर्देशांक वाढलेले आहेत. बाजारातील या वाढीमुळे आगामी काळात बाजारात नफा कमाविण्यासाठी विक्री होऊन बाजार खाली येण्याची शक्यता आहे.
चार दिवसांमध्ये १७ हजार कोटींची गुंतवणूक
परकीय वित्तसंस्थांनी चालू महिन्याच्या पहिल्या चारच दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये १७,८१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दि. १ ते ४ डिसेंबरदरम्यान या संस्थांनी १६,२५० कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तसेच १,२९८ कोटी रुपये हे कर्जरोख्यांमध्ये गुंतविले. त्यामुळे त्यांची एकूण खरेदी १७,८१८ कोटी रुपयांची झाली आहे. परकीय वित्तसंस्थांकडून जोरदार खरेदी होत असतानाच देशांतर्गत वित्तसंस्था मात्र विक्री करून नफा कमावित असल्याचे दिसून येत आहे.चालू महिन्यात या संस्थांनी बाजारातून ६ हजार कोटी रुपये काढून घेतले आहे. मागील महिन्यामध्ये तर त्यांनी तब्बल ४८ हजार कोटी रुपये काढले असून, हा एक विक्रम आहे.
जागतिक घडामोडी
आगामी सप्ताहामध्ये जाहीर होणारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी वगळता देशामध्ये काही नवीन घडामोडी दिसत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घडामोडींवरच भारतामधील बाजार अवलंबून असतील. कोरोनावरील लसीची प्रगती, परकीय वित्तसंस्थांकडून येणारा निधी बाजाराची दिशा ठरविणाऱ्या असतील.
गतसप्ताहातील कामगिरी
निर्देशांक बंद मूल्य बदल
संवेदनशील ४५,०७९.५५ +९२९.८३
निफ्टी १३,२५८.५५ +२८९.६०
मिडकॅप १७,३८९.०२ +७४७.३७
स्मॉलकॅप १७,३१७.२९ +४४२.१४
शेअर बाजाराचे लक्ष्य आता ५० हजार
stock market News : आगामी काही काळ बाजार तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. आता बाजाराचे लक्ष्य हे निफ्टीचे १५ हजार आणि सेन्सेक्सचे ५० हजार याकडे लागले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:37 AM2020-12-07T05:37:52+5:302020-12-07T05:39:32+5:30