- प्रसाद गो. जोशी काहीशा मंदीमध्ये असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल या सप्ताहामध्ये येणार असून, त्यावरच या क्षेत्राची वाटचाल कशी राहणार, हे ठरणार आहे. याशिवाय सुमारे ५० कंपन्यांचे येऊ घातलेले तिमाही निकाल, घाऊक मूल्य निर्देशांकावरील महागाई आणि परकीय वित्तसंस्थांचे धोरण हे बाजाराला दिशा देण्याचे काम करणार आहेत.
आधीच्या दोन सप्ताहांप्रमाणेच गतसप्ताहातही बाजाराने आपली वाढती भाजणी कायम राखली. या सप्ताहात बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ६० हजारांचा टप्पा पुन्हा पार केला. सप्ताहभरात हा निर्देशांक ६०१.८३ अंशांनी वाढून ६०,४३१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १७,८२८ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये २२८.८५ अंशांची वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्येही अनुक्रमे ३६८.९७ आणि ४२४.२४ अंशांची वाढ झाली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप २४,७२०.५७ तर स्मॉलकॅप २८,१४९.५८ अंशांवर पोहोचला होता.सप्ताहाच्या प्रारंभी बाजार इन्फोसिस आणि एचडीएफसी बॅंकेच्या जाहीर झालेल्या निकालांवर प्रतिक्रिया देईल. इन्फोसिसची सर्वच आघाड्यांवर घसरण झाली असून, एचडीएफसी बँकेच्या नफ्यामध्ये वाढ झाली आहे.
या सप्ताहामध्ये जाहीर होणारी चीन जीडीपीची आकडेवारी तसेच घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीची आकडेवारी यावर बाजाराचे भविष्य ठरणार आहे. चलनवाढीचा दर कमी हाेण्याची अपेक्षा असून, त्याचा बाजारावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. गतसप्ताहामध्ये परकीय वित्त संस्थांकडून खरेदी कायम राहिली. आधीच्या सप्ताहातही या संस्था खरेदी करत होत्या. त्यांनी गतसप्ताहात ३३५५.१६ कोटी रुपये गुंतविले असून, चालू महिन्यातील एकूण गुंतवणूक ४९५९.७२ कोटी रुपयांची आहे.
गुंतवणूकदार साडेतीन लाख कोटींनी श्रीमंत- शेअर बाजार वाढत असल्यामुळे बाजारातील नोंदणीकृत आस्थापनांच्या बाजारमूल्यामध्येही वाढ झाली आहे. - गतसप्ताहामध्ये हे बाजारमूल्य ३,५६,११३.८४ कोटी रुपयांनी वाढून ३,६५,९३,८८९.९१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील सप्ताहात त्यामध्ये वाढ झाली होती.