मनोज गडनीस, मुंबई
ग्रीसमधील आर्थिक संकटामुळे भारतासह आशिया खंडातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू झाले असले तरी दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेतील मूलभूत घटकांना मजबुती मिळत असल्याचे संकेत मिळत असून यामुळे पुन्हा शेअर बाजाराच्या माध्यमातून भागविक्री करण्यासाठी भारतीय कंपन्या सज्ज झाल्या आहेत. आगामी सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतीय शेअर बाजारात ८ कंपन्या प्राथमिक भागविक्री करण्यासाठी सज्ज झाल्या असून सुमारे ७२२५ कोटी रुपयांची भागविक्री होणार आहे. विशेष म्हणजे २०१४ या वर्षात १२०० कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात आले. त्यानतंर यंदा हे प्रमाण पाचपटीपेक्षा अधिक आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राष्ट्रीय इस्पात निगम (१५०० कोटी), एजीएस ट्रान्स्ट्रॅक्ट टेक (१३५० कोटी), लवासा (७५० कोटी), दिलीप बिल्डकॉन (७५० कोटी), नवकर कॉर्पोरेशन (६०० कोटी) या कंपन्यांचे आयपीओ सेबीच्या मंजुरीसह शेअर बाजाराच्या उंबरठ्यावर सज्ज आहेत, तर त्यापाठोपाठ आणखी किमान तीन कंपन्यांचेही महाकाय आयपीओ घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत, तर सुमारे ३०० कंपन्यांनी आयपीओचे नियोजन केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये १०० डॉलर प्रति बॅरल इतकी घसरण झाल्याने त्याचा फायदा चालू खात्यातील वित्तीय तूट कमी होण्यास आणि पर्यायाने चलनवाढ आटोक्यात येण्यास मदत झाली. याचा फायदा अर्थव्यवस्था बळकट होण्याच्या रूपाने दिसून येत आहे, तर दुसरीकडे उत्पादन क्षेत्रातही सुधार दिसत असून निर्यातीतही अल्पप्रमाणात वाढ नोंदली जात
आहे.
या सर्वांचा परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीवर सकारात्मकरीत्या होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरापासून ग्रीसमधील आर्थिक संकटाचे काळे ढग जरी देशाच्या अर्थकारणावर आणि शेअर बाजारावर जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत घटकांतील मजबुतीमुळे शेअर बाजारात ‘अच्छे दिन’ येतील असे मानले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्या पुन्हा एकदा शेअर बाजारात सक्रिय होताना दिसत आहेत.
केंद्र सरकार करणार ५३ हजार कोटींची निर्गंुतवणूक
१सरकारने यंदा ५३ हजार कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये नवरत्न श्रेणीतील ५ कंपन्यांचा समावेश असून त्यांच्या निर्गुंतवणुकीच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकार स्वत:च इतक्या आक्रमकपणे बाजारात उतरत असल्यामुळे शेअर बाजाराच्या मनोबलात वाढ झाली आहे.
२तीन वर्षांच्या प्रदीर्घ मंदीनंतर सप्टेंबर २०१३ मध्ये भारतीय शेअर बाजारात तेजीने प्रवेश केला आणि सरत्या दोन वर्षांत सेन्सेक्समध्ये पाच हजार अंशांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने अडीच हजार अंशांची वाढ नोंदविली.
३परिणामी, बाजारात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर घडामोडी अपेक्षित आहेत. याचाच फायदा घेत खाजगी कंपन्याही बाजारात उतरत असल्याचे विश्लेषण प्रीसीजन्स ट्रेंडिग कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम.एस. चोक्सी यांनी केले.
शेअर बाजारात लवकरच होणार ‘आयपीओ’चा महाधमाका!
ग्रीसमधील आर्थिक संकटामुळे भारतासह आशिया खंडातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू झाले असले तरी दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेतील मूलभूत घटकांना मजबुती मिळत असल्याचे
By admin | Published: July 3, 2015 04:17 AM2015-07-03T04:17:53+5:302015-07-03T04:17:53+5:30