नवी दिल्ली - भारतीय शेअर बाजाराने बुधवारी इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी झेप घेतली. शेअर बाजारात नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य ४.१ ट्रिलियन डॉलर्स (३,३३,२६,८८१.४९ रुपये) इतके झाले. केवळ आकड्यांचाच विचार केला तर ही संख्या भारताच्या जीडीपीपेक्षाही अधिक आहे.
इतका मोठा भांडवली बाजार केवळ चार देशांमध्ये आहे. त्यात भारताचाही समावेश झाला आहे. मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असतानाच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, एस अँड पीसह अनेक रेटिंग्ज एजन्सींनी भारतावर विश्वास व्यक्त केला आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या ३.७ ट्रिलियन डॉलर्सची आहे. जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख आहे. शेअर बाजारातील भांडवली मूल्य अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा ०.४ ट्रिलियन डॉलर्सने अधिक आहे.
कशामुळे मिळाली गती?
- मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये वेगाने वाढ झाल्याने बाजाराचे भांडवली मूल्य वाढले आहे. एक एप्रिलनंतर भांडवली मूल्य २७% वाढले.
-मोठ्या १०० कंपन्यांचे भांडवली मूल्य १७ टक्क्यांनी वाढून १९५ ट्रिलियन रुपये इतके झाले. तर इतर कंपन्यांचे बाजार मूल्य ४६ टक्क्यांनी वाढून १३३ ट्रिलियन रुपये इतके झाले.
अमेरिकेत वाढ, चीनमध्ये घट
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार या वर्षात भारताचे शेअर बाजारातील भांडवली मूल्य जवळपास १५ टक्के वाढले आहे. याच वर्षात चीनचे बाजारातील भांडवल ५ टक्क्यांनी घटले आहे.
भारताच्या तुलनेत अमेरिकन बाजार १७ टक्के या गतीने वाढला आहे. संपूर्ण जगभरातील बाजाराचे मूल्य यंदा १० टक्के वाढून १०६ ट्रिलियन डॉलर्स इतके झाले.