Join us

शेअर बाजार : तीन सप्ताहांपासूनच्या घसरणीला पायबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:03 AM

बॅँकांमधील उघड होत असलेले नवनवीन घोटाळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या दरामध्ये वाढ होण्याची भीती, यामुळे निर्माण होऊ शकणारी चलनवाढ आणि परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने काढून घेतली जात

बॅँकांमधील उघड होत असलेले नवनवीन घोटाळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या दरामध्ये वाढ होण्याची भीती, यामुळे निर्माण होऊ शकणारी चलनवाढ आणि परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने काढून घेतली जात असलेली गुंतवणूक अशा नकारात्मक पार्श्वभूमीवरही देशांतर्गत वित्तसंस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराचे निर्देशांक अल्पसे वाढले. यामुळे तीन आठवड्यांच्या घसरणीला पायबंद बसला.गतसप्ताहाचा प्रारंभ मुंबई शेअर बाजारामध्ये आशादायक झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक वाढीव पातळीवर खुला झाला. सप्ताहामध्ये तो ३४१६७.६० ते ३३५५४.३७ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ३४१४२.१५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १३१.३९ अंश म्हणजेच ०.३९ टक्के एवढी वाढ झाली. याआधीचे तीन सप्ताह निर्देशांक सातत्याने घसरत आला आहे.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्ताहामध्ये ०.३७ टक्के म्हणजेच ३८.७५ अंशांची वाढला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १०४९१.०५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप निदॅेशांक ४०.३२ अंशांनी खाली आला, मात्र स्मॉलकॅपमध्ये ३५.९० अंश वाढ झाली.अमेरिकन अर्थव्यवस्था आता सुधारू लागली असून तेथे चलनवाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे आगामी काळात अमेरिकेत व्याजदरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेला दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर व अन्य तरतुदींमुळे परकीय वित्तसंस्थांनी भारतामधून पैसा काढून घेणे सुरू केले आहे. गतसप्ताहात या संस्थांनी ५७८१.९८ कोटी रुपयांची विक्री केली आहे. मात्र याच कालावधीत देशी वित्तसंस्था आणि परस्पर निधींनी ५९७२.६९ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करून बाजाराला खाली जाण्यापासून रोखले. याचाच परिणाम म्हणून सप्ताहाच्या अखेरीस प्रमुख निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झालेले दिसून आले.

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजारमुंबई