मुंबई : मतदानोत्तर चाचण्यांचा कौल मोदी यांच्या नेतृत्वाखालील पारड्यात पडल्यानंतर चार सत्रांत १८०० अंशांची उसळी घेत २४ हजारांची विक्रमी मजल मारणार्या सेन्सेक्सने शुक्रवारी प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी २५ हजारांच्या सर्वोच्च अंशांना स्पर्श केला. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीच्या पार्श्वभूमीवर ११७० अंशांनी त्यात घसरण झाली. परंतु बाजार बंद होतेवेळी २१६ अंशांची तेजी घेत सेन्सेक्स २४,१२१ अंशांच्या सर्वोच्चांकावर स्थिरावला. २००९ मध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर होतेवेळी सेन्सेक्समध्ये दोन हजार अंशांची वाढ झाली होती. एक हजार अंशांच्या वाढीनंतर 'सर्किट' प्रणाली कार्यान्वित होत कामकाज काहीवेळासाठी थांबले होते. असे दोन वेळा झाले होते. मात्र, २००९ मध्ये १८ मे या निकालाच्या दिवशी सेन्सेक्सने एकदिवसीय कामगिरीच्या सर्वोच्चांकाला स्पर्श केला होता. जर भाजपाच्या पारड्यात स्थिर सरकारचे दान पडले तर, अशाच पद्धतीच्या व्यवहाराची अपेक्षा बाजाराला होती. परंतु, दुपारच्या सत्रात नफेखोरी झाल्यामुळे सेन्सेक्समध्ये घसरण होताना दिसली. शुक्रवारी शेअर बाजाराची 'ओपनिंग बेल' वाजल्यानंतर सेन्सेक्सने क्षणात एक हजार अंशांची उसळी घेत मिनिटभरात २५ हजारांची ऐतिहासिक पातळी गाठली. निफ्टीनंही २५० अंशांची झेप घेऊन ७५०० अंशांचा उंबरठा गाठला. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या सुमारे ५३७३ कंपन्याच्या बाजारमूल्यामध्ये वाढ होत ते ८२,०२,९०७ कोटी रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी परकीय वित्तीय संस्थांनी सुमारे ९३४ कोटी ९४ लाख रुपयांच्या समभागांची खरेदी केली. तर देशी वित्तीय संस्थांनी ३८५ कोटी ४० लाख रुपयांच्या समभागांची खरेदी केली. मुंबई शेअर बाजारातील एकूण उलाढाल चार कोटी ८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. ही आजवर एका दिवशी झालेली तिसरी मोठी उलाढाल आहे. (विशेष प्रतिनिधी)
हिंदोळ्यांवर शेअर बाजार
By admin | Published: May 17, 2014 4:49 AM