मुंबई : कंपन्यांचे उत्साहवर्धक तिमाही निकाल आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे गुरुवारी शेअर बाजारात तेजीचे उधाण आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८५पेक्षा जास्त अंकांनी वाढून ७ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही जोरदार तेजी दर्शविली आहे. निफ्टी ८ हजार अंकांच्या वर बंद झाला आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसहच उघडला होता. त्यानंतर तो आणखी वाढतच गेला. सत्राच्या अखेरीस ४८५.५१ अंकांची अथवा १.८८ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २६,५५२.९२ अंकांवर बंद झाला. ४ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. सेन्सेक्सची ही सलग तिसऱ्या सत्रातील तेजी आहे. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ६५0.८५ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ८ हजार अंकांचा टप्पा पार करून पुढे गेला आहे. निफ्टी ८,0६९.६५ अंकांवर बंद झाला. त्याने १३४.७५ अंकांची अथवा १.७0 टक्क्याची वाढ मिळविली. सेन्सेक्समधील ३0पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढले. एल अॅण्ड टीचा समभाग सर्वाधिक १४ टक्क्यांनी वाढला. याशिवाय एसबीआय, भेल, अॅक्सिस बँक, ओएनजीसी यांचे समभागही वाढले. व्यापक बाजारांतही तेजीचाच कल दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १ टक्का आणि 0.८६ टक्का वाढले. छोट्या गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे या निर्देशांकांना लाभ झाला.
शेअर बाजारात तेजीचे उधाण
By admin | Published: May 27, 2016 1:59 AM