Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टॉक ट्रेडिंग स्कूल, नक्की फायदा कुणाचा? शेअर बाजारातील साक्षरता 

स्टॉक ट्रेडिंग स्कूल, नक्की फायदा कुणाचा? शेअर बाजारातील साक्षरता 

भारतीयांची मानसिकता ही कायम क्लास जॉइन करून शिक्षण घेण्याची आहे. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन “दररोज ट्रेडिंग करून हमखास नफा कमवा” अशा किंवा तत्सम फसव्या जाहिराती देऊन क्लास घेणारे अनेक धुरंधर भाबड्या गुंतवणूकदारांकडून भरपूर फी वसूल करताना दिसतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 12:24 PM2024-08-18T12:24:34+5:302024-08-18T12:25:09+5:30

भारतीयांची मानसिकता ही कायम क्लास जॉइन करून शिक्षण घेण्याची आहे. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन “दररोज ट्रेडिंग करून हमखास नफा कमवा” अशा किंवा तत्सम फसव्या जाहिराती देऊन क्लास घेणारे अनेक धुरंधर भाबड्या गुंतवणूकदारांकडून भरपूर फी वसूल करताना दिसतात. 

Stock trading school, who benefits? Stock Market Literacy  | स्टॉक ट्रेडिंग स्कूल, नक्की फायदा कुणाचा? शेअर बाजारातील साक्षरता 

स्टॉक ट्रेडिंग स्कूल, नक्की फायदा कुणाचा? शेअर बाजारातील साक्षरता 

- अजय वाळिंबे 
शेअर बाजार विश्लेषक 

भारतातील अनेक शहरांत अनेक शिक्षित तरुण तसेच मोठा मध्यमवयीन वर्ग आकर्षक परताव्यामुळे आज शेअर बाजारात, तसेच फॉरेक्स ट्रेडिंगकडे वळलेला दिसतो. गेल्या चार वर्षांतील भारतीय शेअर बाजारचा कल हा तेजीचा असल्याने आणि घरबसल्या मोठा परतावा मिळू लागल्याने किंवा शेअर बाजारातील परताव्याच्या अनेक रंजक कथा ऐकून बहुतांशी मध्यमवर्गीय शेअर बाजाराकडे तसेच एफ अँड ओ, क्रिप्टो किंवा फॉरेक्स ट्रेडिंगकडे वळलेला दिसतो. सुशिक्षित पदवीधर तरुणांनादेखील स्पर्धा परीक्षेचा तणाव, बेरोजगारी, प्रवासाचा ताण आणि जीवघेणी स्पर्धा यापेक्षा घरबसल्या शेअर बाजार किंवा ट्रेडिंग जास्त आकर्षक वाटले नाही तरच नवल!! 


फ्युचर/ ऑप्शन तसेच टेक्निकल्सचे सॉफ्टवेअर विकून लाखोंनी कमावणारे अनेक दिसतात; परंतु ते सॉफ्टवेअर वापरून कितीजण प्रत्यक्षात नफा कमावतात? कुठलेही कष्ट न करता कधीच पैसे मिळवता येत नाहीत, ही मूलभूत गोष्टच सामान्य माणूस विसरतो आणि म्हणूनच अशा मार्केट गुरूंचे फावते. अपूर्ण माहिती तसेच सखोल अभ्यास नसल्याने केवळ ऑनलाइन कोर्स करून किंवा केवळ टिप्सवर डे ट्रेडिंग करायला जातात आणि नुकसान झाले की हे आरंभशूर गुंतवणूकदार मूग गिळून बसतात. 

सध्या कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे फुटलेले हे क्लासेसचे पेव आता ऑनलाइन प्रशिक्षणाखेरीज, व्हॉट्सॲप तसेच टेलिग्रामवर ग्रुपपर्यंत गेले आहे. मोबाइलद्वारेही ‘आपका ट्रेडिंग कैसा चल रहा है? हमारी फर्म आपको गॅरंटेड रिटर्न देगी, असे फोन येत असतात. 
गंमत म्हणजे अनेक सुशिक्षित मंडळी या स्कॅमला बळी पडताना दिसतात. एखादा माणूस जुगाराच्या आहारी जातो अगदी तसेच देशातील तरुण गुंतवणूकदार या ऑप्शन ट्रेडिंगच्या आहारी जात आहेत. एफ अँड ओ मधला वार्षिक तोटा सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. 

या प्रकाराला आळा घातला नाही, तर भविष्यात लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करणेच सोडून देतील अशी भीती आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलीय. याला आळा घालण्यासाठी अर्थसंकल्पात एसटीटी दुप्पट करण्यात आला आहे. 
हल्ली शेअर बाजारात गुंतवणूक करणे खूप सोपे आहे असे म्हटले जाते. हे खरे असले त्यासाठी कंपनीची आणि म्युच्युअल फंड योजनेची किमान माहिती असणे आवश्यक आहेच. कुठल्याही गुंतवणुकीसाठी केवळ सुशिक्षित असणे पुरेसे नाही तर त्यासाठी महत्त्वाची आहे ती ‘आर्थिक साक्षरता’. कारण गुंतवणूक करताना परताव्याबरोबरच गुंतवणुकीचा कालावधी, द्रवणीयता आणि सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे.

Web Title: Stock trading school, who benefits? Stock Market Literacy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.