मुंबई - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी झुंज सुरू आहे. मात्र गुजरातमध्ये भाजपाला नुकसान होत असल्याचे संकेत मिळत असल्याने शेअर बाजारात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरुवातीच्या सत्रात सेंसेक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बाजार उघडल्यावर गुजरातमधील निवडणुकीच्या कलांचा प्रभाव सेंसेक्सवर पडला असून, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला होता. मात्र पुढच्या फेऱ्यांमध्ये कांग्रेसला मागे टाकत भाजपाने मोठी आघाडी घेतल्यानंतर शेअर बाजार सावरला असून, सेंसेक्स सुमारे 200 अंकांनी वधारला आहे.
Sensex down by 600.51 points, currently at 32,862.46. Nifty at 10,134.35
— ANI (@ANI) December 18, 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत 181 मतदारसंघांचा कल हाती आला असून, त्यामध्ये भाजपा 96 तर काँग्रेस 83 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं होतं.