मुंबई : आर्थिक गर्तेत अडकलेल्या गो-फर्स्ट कंपनीने त्यांच्या विमानांची तिकीट विक्री तातडीने थांबवावी, असे निर्देश नागरी विमान महासंचालनालयाने कंपनीला दिले आहेत. १२ मेपर्यंत कंपनीने आपल्या विमानांचे उड्डाण यापूर्वीच स्थगित केले आहे, तर १५ मेपर्यंत तिकीट विक्रीदेखील स्थगित केली आहे. मात्र, तिकीट विक्री बंद करण्याचे निर्देश कंपनीला मिळाल्याने आता कंपनीची विमाने कधी उड्डाण करू शकतील, याबद्दल आणखी संदिग्धता निर्माण झाली आहे.
...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या एकूण ५० विमानांपैकी २५ विमाने तांत्रिक कारणाने बंद आहेत तर ज्या कंपन्यांकडून गो-फर्स्टने भाडेतत्त्वावर विमाने घेतली आहेत त्या कंपन्यांनीदेखील हा भाडेकरार रद्द करावा, अशी मागणी डीजीसीएकडे केली आहे. या मागणीवर चालू आठवड्यात निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यात आता डीजीसीएने तिकीटविक्री बंद करण्यास सांगितल्यानंतर कंपनीची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
दरम्यान, या निर्देशांसोबतच नियोजन व सुरक्षा या मुद्द्यावरदेखील डीजीसीएने गो-फर्स्ट कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली असून, त्याचे उत्तर १५ दिवसांत देण्यास सांगितले आहे. या नोटिसीला उत्तर प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा विमान वाहनाचा परवाना सुरू ठेवायचा किंवा कसे, याचा निर्णय होणार आहे.