नवी दिल्लीः भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा तब्बल आठ पट मोठं साम्राज्य उभं करणारे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे फक्त जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत, तर ते आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची संपत्ती १५१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. अर्थातच, त्यामागे दूरदृष्टी आणि अथक परिश्रम आहेत. नोकरी आणि शहर सोडून हे एवढं मोठं विश्व साकारण्याची त्यांनी केलेली किमया निश्चितच प्रेरणादायी आहे.
१६ जुलै १९९५ ला स्थापन झालेली अॅमेझॉन २३ वर्षांत अॅपल खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. सोमवारी अॅमझॉनच्या एका शेअरची किंमत १,८२२.४९ डॉलर इतकी होती. कंपनीचं बाजारमूल्य ८८४.३२ अब्ज डॉलर्सवर गेलंय. येत्या काळात ते आणखी वाढू शकतं.
जेफ बेजोस यांचा झंझावाती प्रवास
१२ जानेवारी १९६४ मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या जेफ यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. जेफ यांच्या आईचं नाव जॅकी गेज जॉर्जसन, तर वडिलांचं नाव टेड जॉर्जसन. जेफचे वडील शिकागोमध्ये वास्तव्याला होते. तिथं त्यांचं दुचाकीचं दुकान होतं. जेफच्या जन्मावेळी त्याची आई फक्त सतरा वर्षांची होती. जेफच्या आई-वडिलांचा संसार फार काळ टिकला नाही. वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. जेफच्या आईनं घटस्फोटानंतर क्युबामध्ये राहणाऱ्या मिगुअल बेजोस यांच्याशी लग्न केलं. आई आणि बाबा लहानपणीच विभक्त झाल्यानं जेफ यांच्याकडे जन्मदात्या पित्याच्या फारशा आठवणी नाहीत.
जेफ यांचं चौथी ते सहावीपर्यंतचं शिक्षण ह्युस्टनमधल्या रिव्हर ओक्स एलिमेंट्रीमध्ये झालं. त्यानंतरच शालेय शिक्षण त्यांनी फ्लोरिडातल्या मियामी पेलमेंटो हायस्कूलमध्ये घेतलं. फ्लोरिडातल्याच महाविद्यालयातून त्यांनी स्टुडंट सायन्सचं प्रशिक्षण पूर्ण केलं. याठिकाणी त्यांचा सिल्वर नाईटनं गौरव झाला. १९८६ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरींगमध्ये पदवी घेतली.
१९९२ मध्ये मॅनहटनमधल्या डी. ई. शॉ साठी काम करताना जेफ यांची भेट मॅक्केनजी ट्टेल यांच्याशी झाली. मॅक्केनजी त्यावेळी याच संस्थेत रिसर्च असोसिएट होत्या. दोघांनी १९९४ मध्ये लगीनगाठ बांधली. त्यानंतर, नोकरी सोडून दोघे देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सिएटल शहरात गेले. याच ठिकाणी जेफ यांनी अॅमेझॉनची सुरुवात केली. जेफ आणि मॅक्केनजी यांना चार मुलं आहेत. पत्नी, तीन मुलं आणि एक मुलगी असं जेफ यांचं षटकोनी कुटुंब आहे. विशेष म्हणजे जेफ आणि मॅक्केनजी यांनी मुलीला दत्तक घेतलं आहे.