- संदीप शिंदे
मुंबई : स्टील, सिमेंट आणि ऊर्जा उद्योगात अग्रणी असलेला जेएसडब्ल्यू ग्रुप पुढील दोन वर्षे चीनहून कोणतीही साधनसामग्री आयात करणार नाही, अशी घोषणा या ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदल यांनी केली आहे. भारत आणि चीन या दोन देशांत निर्माण झालेल्या तणावानंतर जिंदल यांनी घेतलेल्या आक्रमक आणि आत्मनिर्भर भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सज्जन जिंदल यांच्याशी केलेली ही बातचीत
भारतीय उद्योगांनी जागतिक पातळीवरील आपले स्थान कायम राखत चीन डोईजड होणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवे?
सीमेवर भारतीय जवान शहीद झाले असताना स्वत:च्या नफ्याचा विचार करून कमी किंमतीतला चिनी कच्चा माल खरेदी करणे योग्य नाही. आपले जवान आणि सरकार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. स्वस्त चिनी उत्पादनांवर अवलंबून राहण्यापेक्षा भारतीय उद्योगांनी आत्मनिर्भर होण्याची हीच वेळ आहे. भारतातील कच्चा माल उत्तम प्रतीचा आहे. भारतीय उत्पादनांची मागणी वाढल्यानंतर पुरवठ्याची क्षमतासुद्धा वाढेल. त्यातून किंमत नियंत्रणात ठेवणे शक्य होईल आणि काही काळानंतर तो कमी किंमतीतही उपलब्ध होईल. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादने
चिनी उत्पादनांशी नक्कीचस्पर्धा करू शकतील याची मलाखात्री आहे.
अत्यंत माफक दरात चिनी कच्च्या मालाचा पुरवठा होतो. भारतीय स्टील उद्योगाला ते आव्हान पेलणे शक्य आहे का?
भारतीय स्टील उद्योगाला ज्या पद्धतीच्या कच्च्या मालाची गरज आहे त्या उच्च प्रतीच्या मालाचे उत्पादन आपल्या कंपन्यांकडून निश्चितच होते. परंतु, तातडीने ती जबाबदारी आपल्या उत्पादकांवर टाकता येणार नाही. त्यांना काही वेळ द्यावा लागेल. हे स्थलांतर थोडे जिकरीचे असले. परंतु, ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. आपण आपल्या उत्पादनांवर निष्ठा ठेवायला हवी. दूरगामी परिणामांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यातूनच स्थानिक उद्योगांना भक्कम स्थान प्राप्त होईल. भविष्यात जागतिक बाजारपेठेत चीनशी मुकाबला करण्याची क्षमता आपण निश्चितच निर्माण करू शकतो.
कोरोना आपत्तीच्या काळात उद्योगांना सावरण्यासाठी सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने आणि ठोस प्रयत्न केले असे आपल्याला वाटते का?
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अशा अरिष्टाचा सामना करण्याची तयारी कोणत्याही सरकारकडे होती असे मला वाटत नाही. मात्र, आपल्या सरकारने प्रभावी पद्धतीने हाताळली. योग्य वेळी लॉकडाऊन जाहीर करून लोकांच्या जिविताचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले गेले. आता टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे.
कोविडमुळे निर्माण झालेले अरिष्ट दूर होऊन उद्योग स्थिरस्थावर होण्यास आणखी किती काळ लागेल? जेएसडब्ल्यू समूहाने या संकटाचा मुकाबला कसा केला?
आपण आजही या आव्हानात्मक परिस्थितीच्या मध्यावर आहोत. आपला विकास दर हा उणे ४ ते ५ टक्क्यांवर गेला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देणे हे एक मोठे आव्हान आहे. मागणीत आलेली तूट आणि खालावलेली निर्यात यामुळे व्यवसायांची घडी बसायला आणखी थोडा वेळ लागेल. परंतु, आॅक्टोबरनंतर त्या आघाडीवर निश्चितच सकारात्मक वातावरण निर्माण होईल. देशातील बहुतांश उद्योगांप्रमाणेच आम्हालाही लॉकडाऊनच्या काळात उत्पादन कमी करावे लागले. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे.
अनेक मजुरांनी आपापल्या गावी स्थलांतर केले आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच स्थानिकांच्या रोजगाराची मुद्दाही पुढे आला आहे. त्याबाबत तुमचे काय मत आहे ?
मजुरांचे मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर ही तत्कालीन समस्या आहे. परंतु, या मजुरांनी आता पुन्हा माघारी फिरण्यास सुरूवात केली आहे. ते कामावरही रूजू होत आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही परिस्थिती नक्कीच पूर्वपदावर येईल. हे मजूर आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि अनुकूल वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपने आपल्या उद्योगांजवळच मजुरांसाठी टाऊनशीप उभारणीला कायम प्राधान्य दिले आहे. तिथे त्यांना आरामदायी वातावरण असते.
युरोपातील देश आणि अमेरिकेत उद्योगधंद्यांना संजीवनी देण्यासाठी थेट आर्थिक मदत देण्यात आली. भारतीय सरकारने तसे प्रयत्न करावे का?
युरोपीयन देश किंवा अमेरिकेएवढी आर्थिक सुबत्ता आपल्या देशाकडे नाही. मात्र, त्यानंतरही आपल्या सरकारने ज्या वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीतून उद्योगांना निश्चितच फायदा होणार आहे.
केदारनाथच्या पुनर्निर्माणाचे महत्त्वाकांक्षी कार्य तुम्ही हाती घेतले आहे. देशाचे पंतप्रधानही त्याबाबत उत्सुक आहेत. त्या पुनर्निर्माणामुळे कोणते फायदे होतील?
केदारनाथचे पुनर्निर्माण हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. उत्तराखंड सरकारच्या सहकार्याने ते काम आम्ही नेटाने करत आहोत. या पवित्र तीर्थस्थळी दर्शनासाठी येणाऱ्या श्रद्धाळूंचा मार्ग त्यामुळे सुकर होईल. तसेच, पर्यटकांसाठीही ते एक आकर्षण ठरेल. त्यामुळे तीर्थयात्री आणि पर्यटकांची संख्या वाढेल आणि उत्तराखंड सरकारचा महसूल वाढीसाठी भक्कम स्त्रोत निर्माण होईल याची मला खात्री आहे.
चीनशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य भारतीय उद्योगांत, जिंदल यांना विश्वास
भारत आणि चीन या दोन देशांत निर्माण झालेल्या तणावानंतर जिंदल यांनी घेतलेल्या आक्रमक आणि आत्मनिर्भर भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सज्जन जिंदल यांच्याशी केलेली ही बातचीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:31 AM2020-07-11T05:31:33+5:302020-07-11T05:31:42+5:30