नवी दिल्ली : या सणासुदीच्या काळात मालमत्ता खरेदीचे व्यवहार देशभरातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. जोरदार मागणी असल्याने देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत निवासी घरांच्या किमती वार्षिक आधारावर ११ टक्के वाढल्याचे दिसून आले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये घरांच्या किमती सर्वाधिक ३२ टक्के वाढल्या. रिअल इस्टेट क्षेत्रातील शिखर संस्था क्रेडाई, रिअल इस्टेट सल्लागार संस्था कोलियर्स व डेटा अनालिटिक कंपनी लियासेस फोरास या संस्थांनी आपला संयुक्त अहवाल सोमवारी जारी केला.
१५व्या तिमाहीत वाढ
या अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती सरासरी ११ टक्के वाढून ११,००० रुपये प्रति चौरस फूट इतक्या झाल्या आहेत.
मागणी चांगली असल्याने बाजारात सकारात्मक चित्र आहे. २०२१ पासून १५व्या तिमाहीत घरांच्या सरासरी किमती वाढलेल्या दिसत आहेत.
देशातील सर्व आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती वार्षिक आधारे वाढल्या आहेत.
कुठे दर सर्वाधिक?
दिल्ली-एनसीआरमध्ये घरांच्या किमती सर्वाधिक ३२% वाढल्या. शहरात किमती वाढून ११,४३८ रु. प्रति चौरसफूट इतक्या झाल्या आहेत. वर्षभरापूर्वी किमती ८,६५५ रु. प्रति चौ.फू. इतक्या होत्या.
या पाठोपाठ बंगळुरूमध्ये किमती २४ टक्के वाढून ११,७४३ रुपये प्रति चौरस फूट रुपये इतक्या झाल्या. वर्षभरापूर्वी बंगळुरूतील किमती ९,४७१ रुपये प्रति चौरस फूट इतक्या होत्या.