प्रसाद गो. जोशी
कोरोना रुग्णांची जगभरात वाढत असलेली संख्या, अर्थव्यवस्थेला गती मिळण्यात येत असलेल्या अडचणी, विविध सरकारांकडून प्रोत्साहन पॅकेज मिळण्यास होत असलेला विलंब आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली घबराट यामुळे गतसप्ताहात शेअरबाजार मोठ्या प्रमाणात घरंगळला. अखेरच्या दिवशी बाजारात खरेदीदार आल्यामुळे ही घट काही प्रमाणात भरुन निघाली.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहाचा प्रारंभ घसरणीनेच झाला. सप्ताहातील चार दिवस बाजार दररोज खाली येत होता. अखेरच्या दिवशी बाजारामध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने बाजार काही प्रमाणात वाढला असला तरी सप्ताहाचा विचार करता त्यामध्ये मोठी घट झालेली दिसून आली.
जगभरात आणि विशेषत: युरोपमध्ये वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा केले जाऊ शकणारे लॉकडाउन यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मरगळ दिसून आली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने प्रोत्साहन पॅकेज देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्याचप्रमाणे युरोपमध्येही असे पॅकेज मिळणार नसल्याने तेथील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्याचा परिणाम भारतातील तसेच आशियातील शेअर बाजारांवर होऊन तेथेही मोठी घसरण झालेली दिसून आली. आगामी सप्ताहामध्ये फ्यूचर अॅण्ड आॅप्शन व्यवहारांची सौदापूर्ती असल्यामुळे बाजारावर त्याचे कसे प्रतिबींब पडते यावर पुढील दिशा ठरेल. त्याचप्रमाणे सप्ताहाच्या अखेरीस जाहीर होणारे रिझर्व्ह बँकेचे पतधोरण तसेच वाहन विक्रीची आकडेवारी याकडेही बाजाराचे लक्ष लागले असून त्यावर आगामी काळात बाजारात कशी प्रतिक्रिया येते ते बघून तेजी अथवा मंदीचा परिणाम राहील.
परकीय वित्तसंस्थांनी केली जोरदार विक्री
च्जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वारे वाहत असल्याने परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये १०,४९१ कोटी रुपयांची विक्री केली आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनीही गेले काही सप्ताह विक्री केली असली तरी गतसप्ताहामध्ये त्यांनी ४,२०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केल्यामुळे बाजाराला आधार मिळाला.
दृष्टिक्षेपात सप्ताह
निर्देशांक
सेन्सेक्स
निफ्टी
मिडकॅप
स्मॉलकॅप
बंद मूल्य
३७,३८८.६६
११,०५०.२५
१४,३३६.६८
१४,४९५.५८
बदल
-१४५७.१६
- ४५४.७०
- ७११.१२
-८०४.४०