Anil Ambani Reliance Power Share : उद्योगपती अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहेत. त्यांच्या बहुतांश कंपन्या तोट्यात आहेत. अशातच त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या एका कंपनीचे शेअर्स गेल्या काही वर्षात 1 रुपयापर्यंत घसरले होते, मात्र आता या शेअरमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power) चे शेअर्स बुधवारी पाच टक्क्यांनी वाढून 28.65 रुपये प्रति शेअरवर पोहोचले. कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांकी 33.15 रुपये प्रति शेअर आहे, तर निच्चांकी 9.05 रुपये प्रति शेअर आहे. मार्च 2020 मध्ये हा शेअर 1.40 रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर शेअरमध्ये हळुहळू वाढ झाली आणि आज याची किंमत 28 रुपयांवर पोहोचली आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात 144 टक्के परतावा दिला आहे, तर सहा महिन्यांत 60 टक्के परतावा दिला आहे.
अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स 99 टक्क्यांनी घसरले
अनिल अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्च पातळीपासून 99 टक्क्यांनी घसरले आहेत. 16 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत 260.78 रुपये प्रति शेअर होती. पण, हळुहळू हे शेअर खाली येत गेला आणि मार्च 2020 मध्ये याची किंमत 1 रुपयांवर आली. मात्र, त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये थोड्या प्रमाणात रिकव्हरी झाली आणि इथून कंपनीच्या शेअर्समध्ये 2500 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली.
एका वर्षात रक्कम दुप्पट
8 फेब्रुवारी 2023 रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत 11.70 रुपयांवर होती, पण आज एका वर्षानंतर ती रु. 28.65 वर करत आहे. एका वर्षात या शेअरने 144 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच 8 फेब्रुवारी 2023 रोजी जर कोणी या टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 2 लाख 44 हजार रुपये झाली असती.
रिलायन्स पॉवर काय करते?
रिलायन्स पॉवर लिमिटेड ही अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाची कंपनी आहे. रिलायन्स समूह आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. तर रिलायन्स पॉवर भारतातील वीज प्रकल्पांच्या विकासासाठी, बांधकामासाठी आणि ऑपरेशनसाठी काम करते. त्यात काही उपकंपन्याही आहेत. कंपनीकडे सुमारे 6000 मेगावॅटची कार्यरत वीज निर्मिती मालमत्ता आहे.
(टीप- इथे फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)