Stock Market Open Today: शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी बंपर तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 72900 अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 139 अंकांच्या वाढीसह 22122 अंकांच्या पातळीवर उघडला. शुक्रवारी, प्री-ओपन मार्केटमध्ये, बीएसई सेन्सेक्स 106 अंकांनी वाढून 72606 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 65 अंकांनी वाढून 22048 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. मार्चच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात सकारात्मक दृष्टीकोन दिसून आला.
चौथ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये 8.4 टक्क्यांच्या प्रभावी वाढ दिसून येण्यामुळे बाजाराची गती सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. यासोबतच अमेरिकेतील महागाईचे आकडे नियंत्रणात आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीचे टेक्निकल इंडिकेटर्स यामध्ये तेजी येण्याचे संकेत देत आहेत.
शुक्रवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ दिसून आली. तर निफ्टी फार्मा निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते.
बीपीसीएल, टाटा स्टील, हिंदाल्को, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अपोलो हॉस्पिटल, सन फार्मा, इन्फोसिस, एचयूएलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. नेस्ले, ब्रिटानिया आणि एशियन पेंट्सचे शेअर्सही घसरणीसह ट्रेड करत होते. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा कंझ्युमर, सिप्ला आणि एसबीआय लाईफचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत.
गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर आज गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. सातत्यानं सुधारत असलेल्या आर्थिक कामगिरीमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचं कर्जाचं प्रमाण डिसेंबर तिमाहीत घटलं आहे. अदानी समूहाचं निव्वळ कर्ज ते कार्यरत नफ्याचे प्रमाण आता २.५ पटीवर पोहोचलं आहे. यामुळे कर्ज कव्हरेज रेश्यो २.१ पटीवर पोहोचलेय.