लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: नोकरदार वर्गाला फेब्रुवारीपासून वेतनवाढीचे वेध लागतात. किती पगारवाढ मिळू शकते, याची आकडेमोड सुरू होते. मात्र, पुढील वर्षी पगार किती वाढणार, याचा अंदाज आताच व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील कंपन्या २०२४ मध्ये सरासरी ९.८ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देऊ शकतात, असे ‘विलिस टाॅवर वॉटसन’ने (डब्ल्यूटीडब्ल्यू) एका अहवालात म्हटले आहे.
‘सॅलरी बजेट प्लॅनिंग इंडिया रिपोर्ट’ नावाच्या या अहवालात म्हटले आहे की, सर्वच क्षेत्रांतील कंपन्या अजूनही आपल्या उत्पादन खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जास्त वेतनवाढीची शक्यता किती आहे, हे आताच सांगता येणे जरा कठीण आहे. २०२३ मध्ये सुमारे १० टक्के सरासरी वेतनवाढ मिळाली आहे. त्यापेक्षा थोडी कमीच म्हणजे सरासरी ९.८ टक्के वेतनवाढ २०२४ मध्ये मिळेल, असा अंदाज आहे.
वेतन बजेटमध्ये वाढ
२०२२च्या तुलनेत यंदा अर्ध्यापेक्षा अधिक कंपन्यांनी वेतन बजेटमध्ये वाढ केली आहे. एक चतुर्थांश कंपन्यांनी बजेटमध्ये आधीच्या अंदाजाच्या तुलनेत वाढ केली आहे.
आयटी क्षेत्रात निराशा हाेणार?
- आयटी क्षेत्रातील वेतनवाढीत घसरण होण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये या क्षेत्रात सरासरी ११ ते १२ टक्के वेतनवाढीचा अंदाज आधी व्यक्त केला होता.
- तो आता घटवून १० टक्के करण्यात आला आहे. वस्तू उत्पादन, औषध निर्माण, माध्यम आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांत वेतनवाढीचा अंदाज वाढताना दिसत आहे.
- ३६% - कंपन्या पुढील १२ महिन्यांत महसुलाबाबत सकारात्मक आहेत.
- २८% - कंपन्या पुढील वर्षी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करतील.
- ६०%- कंपन्यांनी यावर्षी नुकतीच भरती प्रक्रीया पूर्ण केलेली आहे.
भारतात सर्वाधिक वेतनवाढ
- एप्रिल आणि मे २०२३ मध्ये हे सर्वेक्षण केले. यात १५० देशांतील कंपन्या सहभागी झाल्या.
- भारतातील ७०८ कंपन्यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले. संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्रात सर्वाधिक वेतनवाढ भारतात होणार आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम (८ टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन (६ टक्के) आहे.
- बॅंका, वित्तीय सेवा, विमा, गेमिंग, प्रसार माध्यमे, तंत्रज्ञान तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात पुढील वर्षी १० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज अहवालातून व्यक्त केला आहे.