नवी दिल्ली : ‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईजेस लिमिटेड’चे चेअरमन सुभाषचंद्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे. मात्र सुभाष चंद्रा यापुढे कंपनीचे अ-कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणार आहेत.कंपनीच्या वतीने नियामकीय दस्तावेजात ही माहिती देण्यात आली. कंपनीने म्हटले की, सेबी सूचिबद्धता नियमातील १७ (आयबी) कलमातील तरतुदीनुसार सुभाषचंद्रा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला. या कलमान्वये कोणत्याही कंपनीचा चेअरमन त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संबंधित नसावा. त्यामुळे सुभाषचंद्रा यापुढे कंपनीचे अ-कार्यकारी संचालक म्हणून कायम राहतील.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कंपनीच्या समभाग धारणेत (शेअरहोल्डिंग) बदल होऊ घातल्याच्या पार्श्वभूमीवर सुभाषचंद्रा यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात झी एंटरटेन्मेंटचा प्रवर्तक असलेल्या एस्सेल समूहानेकंपनीतील १६.५ टक्के हिस्सेदारी विकण्याची योजना असल्याचे जाहीर केले होते.
‘झी’च्या चेअरमनपदाचा सुभाषचंद्रा यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:48 AM