नवी दिल्ली : झी समुहातील प्रमुख कंपनी असलेल्या झी एंटरटेनमेंट कंपनीचे प्रवर्तक सुभाष चंद्रा यांच्याकडे या कंपनीच्या समभागांपैकी एक टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा राहणार आहे. यामुळे या कंपनीच्या एकूण निर्णयप्रक्रियेमधील त्यांचा सहभाग कमी होणार असला तरी त्यांचे पुत्र हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अजून पाच वर्षे राहणार आहेत.
सुभाष चंद्रा यांच्याकडे सध्या या कंपनीचे २२.३९ टक्के समभाग आहेत. त्यापैकी २१.४८ टक्के समभाग त्यांनी तारण म्हणून ठेवलेले आहेत. तारण ठेवलेल्या समभागांपैकी १०.७१ टक्के समभाग एस्क्रो खात्यामध्ये ठेवण्यात आले आहेत. उर्वरित समभाग हे व्हीटीबी बॅँकेकडे आहेत. सुभाष चंद्रा यांच्याकडील समभागांची खरेदी ही मीडियामधील विविध घटकांनी एकत्र येऊन बनविलेल्या संघटनेमार्फत केली जाण्याची शक्यता आहे. सोनी आणि रुपर्ट मरडॉक यांच्या न्यूज कॉर्पाेरेशनचा त्यामध्ये समावेश असल्याचे समजते. या दोन्ही संस्थांकडे सध्या या कंपनीचे ६१८७ कोटी रुपयांचे समभाग आहेत. चंद्रा यांच्या कंपनीचे प्रवर्तक वैयक्तिक पातळीवर संभाव्य गुंतवणूकदार तसेच कर्जदारांशी सातत्याने चर्चा करीत आहेत. सप्टेंबरमध्ये एस्सेल ग्रूपने झी एंटरटेनमेंट एण्टरप्रायजेस लिमिटेड (झील) या कंपनीच्या समभागांपैकी पहिल्या टप्प्याचे हस्तांतरण ओपनहायमर डेव्हलपिंग मार्केट फंडला केल्याचे जाहीर केले. जुलैमध्ये एस्सेल फंडाने झीलमधील प्रवर्तकांच्या समभागांपैकी ११ टक्के या फंडाला देण्याची घोषणा केली होती.
एस्सेल ग्रुपला असलेली देणी चुकविण्यासाठी आपल्या मालमत्तेची विक्री करून योग्य ती रोखता मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने योग्य पावले पडत असल्याचे यामधून स्पष्ट झाले. आपल्याकडील मीडियाशिवायची मालमत्ता विकून त्या पैशांमधून देणी पूर्णपणे फेडण्याचा प्रयत्न असल्याचे या समुहाने स्पष्ट केले होते. आॅक्टोबर महिन्यामध्ये व्हीटीबीने जाहीर केले की, कर्जाच्या अटींप्रमाणे व कर्जदाराच्या सहमतीने १०.७१ टक्के समभाग हे विक्री करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे सुभाषचंद्र यांची कंपनीतील हिस्सेदारी कमी होण्याचे संकेत मिळाले होते.पुनीत गोएंका सीईओकंपनीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये पुनीत गोएंका यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर गोएंका यांची मुदत संपत असून त्यानंतर पुढील पाच वर्षे ते या पदावर राहतील. पुनीत हे सुभाष चंद्रा यांचे पुत्र आहेत. त्या माध्यमातून चंद्रा यांची कंपनीवर काही प्रमाणात पकड कायम राहू शकेल.शेअर बाजार नव्या निर्देशांक उच्चांकावरमुंबई : बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत जोरदार खरेदी झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा नव्या उच्चांकासह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२१.५५ अंकांनी वाढून ४०,४६९.७८ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांक ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४८.८५ अंकांनी वाढून ११,९६६.०५ अंकांवर बंद झाला.