नवी दिल्ली : फेम-३ योजनेला अंतिम रूप दिले जात नाही, तोपर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहनांवर सबसिडी देणाऱ्या ‘इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना (ईएमपीएस) २०२४’ला मुदतवाढ देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी केली.
‘ऑटोमोटिव्ह कम्पोनेंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या (एसीएमए) वार्षिक अधिवेशनात कुमारस्वामी यांनी सांगितले की, ‘हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहन गतिमान स्वीकार व उत्पादन योजने’च्या (फेम) तिसऱ्या टप्प्याला अंतिम रूप देण्यास आणखी काही काळ लागणार आहे.
ईएमपीएस किती काळ सुरु राहील?
ईएमपीएसला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. फेम-३ योजनेची घोषणा होत नाही, तोपर्यंत ईएमपीएस सुरू राहील. या योजनेत दुचाकी ईव्हीवर १० हजार रुपयांपर्यंत, तर तीनचाकी ईव्हीवर ५० हजार रुपयांपर्यंत सबसिडी सरकारकडून दिली जाते.
मुदत महिन्याच्या अखेरीपर्यंत
ज्ञात असावे की, ईएमपीएस योजना याच महिन्याच्या अखेरीस समाप्त होत आहे. ही योजना एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तिला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. फेम-३ योजना हंगामी ‘इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना (ईएमपीएस) २०२४’ची जागा घेईल. फेम-३ च्या खर्चाशी संबंधित प्रश्नावर कुमारस्वामी यांनी सांगितले की, याची लवकरच घोषणा केली जाईल. फेम-३ साठी योजनेत काही सुधारणा केल्या जात आहेत. त्यावर काम सुरू आहे.