Join us

कमाल! 150 वेळा रिजेक्ट झाली आयडिया पण 'तो' खचला नाही; उभारली 64 हजार कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 2:27 PM

150 वेळा रिजेक्ट झाल्यावर देखील हर्ष यांनी हार मानली नाही. आपली कल्पना बदलली नाही.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. हर्ष जैन यांची अशीच प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे, त्यांनी एका कल्पनेवर व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला, परंतु तो सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. हर्ष यांनी पैसे जमा करण्यासाठी खूप प्रयत्न केले. 10-20 नव्हे तर 150 वेंचर्समध्ये जाऊन त्यांनी कल्पना मांडली आणि त्यांना गुंतवणूक करण्याची विनंती केली. पण त्यांची ही कल्पना सर्वांनीच नाकारली.

150 वेळा रिजेक्ट झाल्यावर देखील हर्ष यांनी हार मानली नाही. आपली कल्पना बदलली नाही. अखेरीस त्यांना एक गुंतवणूकदार सापडला आणि हर्ष यांची कल्पना आता स्टार्टअपच्या रूपात लोकांसमोर आली. हर्ष यांचं धाडस आणि आत्मविश्वासाचं फळ मिळालं. आज त्यांच्या कंपनीची मार्केट वॅल्‍यू 64 हजार कोटींहून अधिक आहे.

हर्षने यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये त्यांनी फॅन्टसी गेमची कल्पना तयार केली आणि त्यावर एप बनवण्यासाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला. कल्पना घेऊन 10-20 नाही तर 150 लोकांकडे गेलो, पण सगळ्यांनी रिजेक्ट केलं. अखेर फंडिंग मिळालं आणि Dream11 नावाचं फँटसी गेमिंग एपचं रुपांतर आता एका मोठ्या कंपनीत झालं आहे. 

2008 मध्ये जेव्हा देशात पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) आयोजित करण्यात आली होती. हर्ष यांना तेव्हा ही कल्पना सुचली आणि त्यांचा पार्टनर भावितसोबत ड्रीम11 प्रोजेक्ट तयार केला. कुठूनही निधी न मिळाल्याने या दोन मित्रांनी स्वत:चे पैसे गुंतवून ते सुरू केलं. 2014 मध्ये पहिल्यांदा Dream11 सुरू करण्यात आलं आणि त्याच वर्षी युजर्सची संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचली. 2018 पर्यंत, संख्या 4.5 कोटी झाली, जी सध्या सुमारे 20 कोटी आहे.

हर्ष यांच्या मेहनतीला फळ मिळू लागलं आणि त्याची कंपनी 2019 मध्ये युनिकॉर्न बनली. याचाच अर्थ त्यांच्या कंपनीचे मार्केट वॅल्यू 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8300 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. 2020 मध्ये ड्रीम 11 ला आयपीएलची स्प़ॉन्सरशिप मिळाली. आज या कंपनीला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी स्पॉन्सर करण्याचा अधिकारही मिळाला आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय