नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच 9000 हॉर्स पॉवरचे शक्तिशाली इंजिन तयार केले जाणार आहे. यासाठी गुजरातमध्ये एक कारखाना उभारण्यात येणार असून, त्याचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय रेल्वेचा हा सातवा कारखाना असणार आहे. शक्तिशाली इंजिन तयार केल्यानंतर, मालगाडीचा सरासरी वेग वाढेल. याशिवाय, कारखाना सुरू झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
भारतीय रेल्वे गुजरातमधील दाहोद येथे इंजिन कारखाना उभारणार आहे. पंतप्रधान 20 एप्रिल रोजी कारखान्याचे भूमीपूजन करतील. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण प्रकल्पात 20000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये 9000 एचपीचे इंजिन तयार केले जातील. आतापर्यंत देशात 4500 आणि 6000 एचपीच्या क्षमतेचे इंजिन तयार केले जात आहेत. हे शक्तिशाली इंजिन 4500 टन क्षमतेच्या मालवाहू ट्रेनला ताशी 120 किमीच्या वेगाने धावू शकते. सध्या मालगाडीचा कमाल वेग 100 किमी प्रतितास आहे. या कारखान्यात 1200 इंजिन तयार होणार आहेत.
काय होईल फायदा?
गुजरातमध्ये कारखाना सुरू झाल्याने आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. दुसरीकडे, शक्तिशाली इंजिन तयार झाल्यामुळे मालगाडीचा वेग वाढणार आहे. त्यामुळे कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची वाहतूक करता येणार असून त्याचा फायदा व्यापारी व व्यावसायिकांना होणार आहे. मालगाड्याही वारंवार फेऱ्या करू शकतील. अशा प्रकारे हा कारखाना देशाच्या आर्थिक प्रगतीत सहकार्य करेल.
इंजिनला अपग्रेड करून क्षमता वाढवली
भारतीय रेल्वेने चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, कोलकाता येथे 9000 एचपीच्या हायपॉवर इलेक्ट्रिक इंजिन विकसित केले. हे इंजिन मॉडीफाय करून तयार करण्यात आले. ज्याचा वेग आणि क्षमता सामान्य इंजिनपेक्षा जास्त आहे. हेच पुढे नेत 9000 एचपीच्या इंजिनसाठी कारखाना उभारला जात आहे.
सध्याचे कारखाने...
- चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना, चित्तरंजन
- डिझेल रेल्वे इंजिन कारखाना, वाराणसी
- इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई
- रेल कोच फॅक्टरी, कपूरथला
- मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली
- डिझेल इंजिन आधुनिकीकरण कारखाना, पटियाला